घन:श्याम कडू
उरण : देशात उष्णतेमुळे वातावरण तापू लागले आहे. त्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. तीन चार दिवसांपूर्वी जेएनपीटी येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचार सभा संपन्न झाली. त्या सभेत त्यांनी सर्वाधिक विकासकामे ही आपण उरण मतदारसंघात केली असल्याचा दावा केला होता. जर त्यांनी सर्वाधिक विकास केला मग आजच्या घडीला सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्यां कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याचे दिसत आहे. यावरून उरणकरांसाठी गेली १० वर्षे खासदार म्हणून श्रीरंग बारणे हे निष्क्रिय ठरले असल्याची चर्चा उरण मतदारसंघात सुरू आहे.
खासदार श्रीरंग बारणे हे गेली १० वर्षे मावळ या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मावळ मतदारसंघात उरण विधानसभा मतदार संघ येत आहे. परंतु या उरण मतदार संघाकडे त्यांनी स्वतःच्या माध्यमातून कोणता विकास केला हे दाखवावे असे उरणचे मतदार सांगतात. जी काही शासकीय पातळीवर विकासकामे झाली आहेत, ती आधीच मंजूर झाली होती. ती फक्त त्यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेली आहे. जेएनपीए बंदरा नजीक सर्वात मोठी पार्किंग ठेका स्वतः घेऊन ती त्यांचा माऊली व येथील शिवसेनेचा (उबाठा) गटाचा पदाधिकारी सांभाळण्याचे काम इमानदारीने करीत असल्याचा आरोप मतदार करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच बारणे यांना प्रचारासाठी जेएनपीएचा हॉल मिळाला असल्याची चर्चा सुरू आहे.
श्रीरंग बारणे यांनी विकासकामे केलीत मग आजच्या घडीला किड्यामुग्या सारखे अपघात होऊन अनेकजण जखमी व वेळीच उपचार न मिळाल्याने मयत होण्याच्या घटना वारंवार घडत असताना व सर्वाधिक कंपन्या असतानाही याठिकाणी एक सुसज्ज हॉस्पिटल १० वर्षात खासदार बारणे यांना का उभारता आले नाही. त्याचबरोबर येथील सर्वाधिक जमीन सिडकोने संपादित करूनही उरणकरांसाठी मैदान नाही. साडेबारा टक्केचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. सेफ्टी झोन, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचा प्रश्न, नोकरभरती, वाहतूक कोंडी, अनधिकृत केमिकळयुक्त यार्ड, वाढीव गावठाण, पाणी प्रश्न, तसेच सीएसआर फंडापासून उरणकर वंचीत अशा अनेक समस्यांचा सामना येथील मतदारांना करावा लागत आहे. तसेच जेएनपीएचे खासगीकरण होऊ देणार नाही अशा वल्गना करूनही खासगीकरणाचे वारे सुसाट सुटले आहे. हे सोडवण्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत असा सवालही मतदार करीत आहेत.
उरणमधील नेतेमंडळी महायुती बरोबर आहेत ते मोठमोठ्या बढाया मारून तुम्हांला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा बढाया मारणाऱ्यांची गेली कित्येक वर्षांपासून कामे निधीअभावी अपुरी आहेत. मात्र, उरणमधील सर्वसामान्य मतदार हा गेली १० वर्षे खासदार बारणे हे निष्क्रिय ठरले असल्याने यावेळी बदल अटळ असल्याचे सांगतात.
