मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहतुक कोंडीचा नागरिकांना फटका
सलीम शेख
माणगाव : शाळा, विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्यानंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरिकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून माणगावात वाहतूक कोंडीची साडेसाती कायम राहिल्याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
पुणे व पश्चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रायगडात आले आहेत. दर शनिवार–रविवार व हॉलीडे आला की, माणगाव बाजारपेठेत प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. माणगावचे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीशी सामना प्रवासी नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरम्यानच्या काळात प्रवाशांचे पाण्यासाठी हाल झाले. त्यामुळे पर्यटक नागरिकांच्या उत्साहावर वाहतूक कोंडीचे पाणीच पडले. कोकण व तळ कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. दर शनिवारी-रविवारी माणगाव व इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या दोन्ही बाजारपेठेला बायपास काढण्याचे काम गेले अनेक वर्षापासून सुरु असून ते काम रखडले असल्याने नागरिकांना याचा नाहक फटका बसत आहे. आज सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर या शहरात वाहतूक कोंडी झाली आहे.
उन्हाळ्याचे सुट्ट्या असल्याने महामार्गांनी प्रवासी नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक संत गतीने सुरु होती. मुंबई–गोवा महामार्गावर मुंबई बाजूकडून वाहनाच्या रांगा महामार्गावर दिसत होत्या. पुणे बाजूकडून समुद्र व पर्यटना स्थळावर मौज मजा करण्यासाठी आपल्या कुटुंब व मित्रासह ग्रुप सहलीसाठी मोठ्या प्रमाणांत आले आहेत. त्यामुळे सर्वांनाच या वाहतुक कोंडीचा फटका बसला. मुंबई–गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव येथील बायपासचे काम पूर्ण झाल्यास माणगावमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटेल. अशी आशा नागरिकांना वाटत असून हि वाहतूक सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलीस व माणगाव पोलीस विशेष प्रयत्न करीत आहेत.
