अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील घटना
अब्दुल सोगावकर
सोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी ‘तुम्ही बाहेरचे’ असे फिर्यादीने बोलल्याचा राग मनात धरून ७ जणांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ तसेच मुलगा यांना काठी, बॅट, स्टंपने हातावर व हाताच्या उजव्या अंगठ्यावर मारहाण केल्यामुळे आरोपींविरुद्ध अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचा पुतण्या आरोपी क्र. १ यांना ‘तुम्ही बाहेरचे’ असे बोलला, याचा राग मनात धरून आरोपी क्र. १ याने गैरकायद्याची मंडळी जमा करून आरोपी क्र. १ व तिचा पती आरोपी क्र. २ व त्याचा दीर आरोपी नं. ४, ५, ६, ७ सर्व राहणार सोगाव, पो. मापगाव, ता. अलिबाग यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी, भाऊ व मुलगा यांना घरात घुसून काठी, बॅट, स्टंप यांनी हातावर व हाताच्या उजव्या अंगठ्यावर उपटी मारून दुखापत केली. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.११९/२०२४ भा.दं.वि.क. ३२४,१४३,४५२,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे हे करीत आहेत.