विश्वास निकम
कोलाड : एसटीने प्रवास करणे महिलेला महागात पडले आहे. लालपरीत चोरटे डल्ला मारत असल्यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात एकच संतापाची लाट उसळली असून महिला प्रवाशांची चिंता वाढली आहे. सदरची घटना ही माणगाव कोलाड दरम्यानच्या प्रवासात घडली असुन सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सविता पांडुरंग शेडगे (वय ४०, सध्या रा मनिषा नगर कळवा ठाणे, मूळ राहणार मालुस्ते ता. माणगांव, जिल्हा रायगड) या एसटी बसमध्ये माणगाव कोलाड दरम्यान प्रवास करत असताना त्यांचेकडील दागिने तसेच रोख रक्कमेसह पर्स एका आज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवार, दि. १३ मे रोजी सकाळी १०:४५ वाजता घडली. याबाबत कोलाड पोलिस ठाण्यात चोरीबाबतची तक्रार दाखल काण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरिक्षक मोहिते यांच्यासह सहकारी यांनी घटनस्थळाला भेट दिली. कोलाड पोलीसांकडून याबाबत मिळालेल्या माहितीनूसार वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी या त्यांचे राहते घर मालुस्ते ता. माणगांव जि. रायगड येथुन ठाणे येथे जाणेकरीता माणगांव बस स्थानकावरून श्रीवर्धन-ठाणे या बसमधुन प्रवास करित असताना बस कोलाड बस थांबा येथे आले वेळी फिर्यादी यांचे ताब्यातील पर्समधील दागिने व रोख रक्कम बसमधुन कोणातरी अज्ञात इसमाने चोरून नेली. ६० हजार रुपये किमतीचे १.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंथन, २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याची फुले, २० हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातली सोन्याची चैन, २० हजार रुपये किंमतीचे ३ सोन्याचे अंगठ्या एक २ ग्रॅम वजनाची व दोन प्रत्येकी दीड ग्रॅम वजनाच्या, २०२०० रोख रक्कम असा एकुण १,४०,२०० रुपये किमतीच्या मुद्देमालावर डल्ला मारला.
घडलेल्या घटने संदर्भात कोलाड पोलीस स्टेशन गु. र. नं. ००५१/२०२४ भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे नोंद करण्यात आली असून कोलाड पोलिस निरिक्षक मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई चौधरी हे अधिक तपास करीत आहेत.