नागोठणे (नितीन गायकवाड)
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसई स्टॉप येथील 'आराध्य जनरल व टी स्टोअर्स' दुकानामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी यशस्वी छापा टाकला असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९५० च्या कलम ४ व ५ नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८:२० वाजण्याच्या सुमारास पाटणसई स्टॉप येथील आराध्य जनरल व टी स्टोअर्स दुकानात आरोपी परशुराम भागोजी तेलंगे (वय ७० वर्षे, रा. बाळसई, ता. रोहा, जि. रायगड) हा विनापरवाना व बेकायदेशीररीत्या कल्याण ओपन नावाचा मटका जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. तसेच, अंकुश झिमरे आणि शिरसे बुवा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे मोबाईलवरील व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे कल्याण ओपन मटका जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये ९३० रुपये रोख, ५,००० रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन, एक लाल व काळ्या रंगाचे छोटे पावती पुस्तक, एक निळ्या रंगाचा बॉलपेन आणि एका छोट्या आकाराचा निळ्या रंगाचा कार्बन पेपर यांचा समावेश आहे. पोलीस शिपाई स्वप्नील मिलिंद भालेराव यांनी या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एम. सावंत पुढील तपास करत आहेत.