उरणमधील ३० वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनी साईटवर स्थळ शोधणे महागात पडले असून, परदेशी नवरदेवाच्या आमिषाने सायबर भामट्यांनी तिला ५.५२ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.
उरण (घनःश्याम कडू)
ऑनलाइन विवाह संकेतस्थळावर जोडीदार शोधणे उरणमधील एका ३० वर्षीय तरुणीला महागात पडले आहे. ब्रिटनमध्ये (यूके) स्थायिक असलेला उच्चशिक्षित तरुण असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी तिला विवाहाचे आमिष दाखवले आणि पार्सल व डिमांड ड्राफ्टच्या विविध शुल्कांच्या नावाखाली तब्बल ५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात (Advertisement)
फिर्यादी तरुणीने विवाहासाठी एका नामांकित ऑनलाइन मॅट्रिमोनी संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथे 'अविराज देशपांडे' नावाच्या एका भामट्याने तिच्याशी संपर्क साधला. आपण ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्याचे सांगून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवला.
काही दिवसांनी, ब्रिटनमधून महागड्या भेटवस्तूंचे पार्सल पाठवल्याचे त्याने तरुणीला सांगितले. हे पार्सल जम्मू-काश्मीरमधील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागात अडकल्याचा बनाव रचून 'गुरसेल' नावाच्या व्यक्तीने तरुणीला संपर्क केला व पार्सल सोडवण्यासाठी शुल्क भरण्यास सांगितले. विवाहाच्या आशेने तरुणीने हे पैसे भरले.