घन:श्याम कडू
उरण : उरण नगरपालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या नावाखाली लाखों रुपये खर्च केले जात असतात. तरीही पावसाळ्यात पाण्याचा निचरा न झाल्याने शहरातील अनेक भागात भर रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळते. यावरून दरवर्षी उरण नगरपालिकेतर्फे नालेसफाईच्या नावाखाली महाघोटाळा होत असल्याचे उघड होते. याबाबत सर्वच राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी चिडीचूप असल्याने त्यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जेव्हा प्रत्यक्षात पाऊस सुरु होतो, तेव्हा उरणकरांना पाऊस नकोसा वाटतो, कारण गेल्या अनेक वर्षांपासून नालेसफाई कामातला घोटाळा यंदाही खुलेआम सुरु आहे. सध्या उरण पालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामं कासव गतीनं सुरु होती. विशेष म्हणजे, नालेसफाईच्या नावावर काढलेला हा गाळ ओलसर दिसावा, यासाठी कंत्राटदारांनी ही युक्ती लढवल्याचं बोललं जात आहे. जिथे कायद्याचा आणि नियमांना धाब्यावर बसवून उरणकरांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे प्रकार सुरु आहेत. यावर्षीही नालेसफाईचा ठेका हा २० ते २५ लाखाचा असून त्यात वाढ करून तो ३५ लाखाच्या वर नेला जाईल अशी माहिती नगरपालिकेच्या अधिकृत सूत्रांकडून समजली.

गेल्या दोन वर्षात उरणमध्ये पावसाळा नालेसफाई घोटाळा आणि रस्ते घोटाळ्यांनी गाजला. कारण घोटाळे उघड झाल्यानंतर कारवाईचं आश्वासन देऊन सत्ताधारी हा विषय आटोपता घेतात. मात्र भ्रष्ट कंत्राटदार आणि त्यांच्यावर मेहेरबानी करणारे खुर्चीसम्राट यांच्यामुळे उरणकर दिवसेंदिवस गाळातच रुतत चाललं आहे.

आज पडलेल्या पावसामुळे उरण शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र पहावयास मिळत होते. पाणी साचल्यानंतर घटनास्थळी नगरपालिकेचे कर्मचारी, ठेकेदारांची माणसे पाण्याचा निचरा करण्यासाठी किंवा नागरिकांना योग्य त्या सूचना करण्यासाठी उपस्थित नसतात. ज्यांच्याकडे उरण नगरपालिकेचे आरोग्य खाते आहे, त्यांना उरणच्या जनतेचे सोयरसुतक नसून त्यांना फक्त ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मलिदा कसा मिळेल याकडे लक्ष असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे.
