• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दुर्मिळ पिसूरी हरणाला निसर्गमित्रांनी दिले जीवदान

ByEditor

Jul 18, 2024

वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे रवाना

अनंत नारंगीकर
उरण :
चिर्ले येथील मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसूरी हरीण आढळून आले होते. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सदर जखमी अवस्थेतील पिसूरी हरीणीला ताब्यात घेऊन उरण वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर, पुणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर भागात स्थानिक ग्रामपंचायत, महसूल व वन विभाग यांच्या साटेलोट्यामुळे कंटेनर यार्ड, गोदाम, दगड खाणी व्यावसायिकांनी शिरकाव केल्याने वन्यजीव मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. त्यातच समवेदा सावला यार्डजवळ एक वेगळा असा दिसणारा प्राणी तेथील कामगार प्रथमेश मढवी यांनी पाहिला. मात्र, त्या प्राण्याची ओळख नसल्याने चिर्ले येथील वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य, सर्पमित्र नितिन मढवी यांना सदर अनोळखी दिसणाऱ्या प्राण्याची माहिती दिली. नितीन मढवी व त्याचे सहकारी रोहित पाटील, ऋषभ पाटील, कुणाल घरत, कुंदन पाटील यांनी लगेचच घटनास्थळी हजर राहून त्या जखमी प्राण्याला शिताफीने पकडून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांना सदर अनोळखी दिसणाऱ्या प्राण्याची माहिती दिली. त्या प्राण्याची ओळख पिसुरी हरीण असून हा प्राणी आपल्या परिसरातील दुर्मिळ असल्याचे विवेक केणी यांनी सांगितले.

दुर्मिळ प्राण्याची माहिती वन्यजीव निसर्ग संस्थेने वनविभागाचे उरण अधिकारी नथुराम कोकरे यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने हा प्राणी जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राणी जखमी असल्याने तो जंगलात जात नव्हता. त्यानंतर मात्र त्या पिसूरी हरीण प्राण्याला उरण वनविभागाचे अधिकारी नथुराम कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी वनवीभाचे वनरक्षक संतोष इंगोले, राजेंद्र पवार, अनिकेत झेंडे, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य महेश भोईर, नितिन मढवी, सुमित मढवी, सिद्धार्थ मढवी, मनीष मढवी, प्राणी पक्षी निरीक्षक निकेतन ठाकूर आदी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!