• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मेगा ब्लॉकच्या वेळेत बदल केल्याने कोलाडजवळ वाहतूक कोंडी

ByEditor

Jul 19, 2024

मिलिंद माने
महाड :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कोलाड जवळील पुई गावाजवळ पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा वेळेत अचानक बदल केल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाडजवळ सुमारे तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुई गावाजवळ असणाऱ्या नवीन पुलावरील गर्डर टाकण्यासाठी १८ व १९ जुलै या दोन दिवसात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र यामध्ये आज 19 जुलै रोजी अचानकपणे मेगाब्लॉकच्या वेळेत बदल करण्यात आला. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हा ब्लॉक असताना अचानकपणे सकाळपासूनच मेगाब्लॉक घेतल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या अनेक शासकीय व खाजगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला असून वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने दोन्ही बाजूकडे सुमारे तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच मुसळधार पाऊस असल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. एकंदरीत मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन या पुलाचे काम करणाऱ्या कंपनीकडे नसल्याने याचा फटका शासकीय कर्मचाऱ्यांसह या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना बसला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्यापासून माणगावपर्यंत मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्डे पडले असून अनेक खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठल्याने या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आधीच रस्त्यावर खड्ड्याचे विघ्न त्यातच मेगाब्लॉकच्या वेळेत केलेल्या बदलामुळे याचा नाहक मनस्ताप सकाळी कामावर जाणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांसह अनेकांना बसला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!