साप चावलेल्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू, कर्जत तालुक्यातील आसलवाडीची घटना
रस्ता नसल्याने झोळी करून आणावे लागले रुग्णालयात
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील आसलवाडीमधील विठाबाई विठ्ठल सांबरी यांना सोमवारी शेतात काम करताना साप चावला. शेतावरून घरी आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरु झाली. रस्ता नसल्याने झोळी करून ग्रामस्थांनी त्यांना जुमापट्टी येथे आणून पुढे वाहनाने नेरळ प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यांची प्रकृती नाजूक असल्याने पुढे नेण्याचा सल्ला देण्यात आला. पुढील उपचाराला जातानाच विठाबाई यांची प्राणज्योत मालवली. रस्ता नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या मुर्दाड प्रशासनाने आमच्या भगिनीचा बळी घेतला असा आरोप आदिवासींनी केला आहे. या प्रकरणामुळे १२ वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कर्जत तालुक्यातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान डोंगराच्या कुशीत अनेक आदिवासी वाड्या, वस्त्या आहेत. मात्र देशाचा अमृतमहोत्सव साजरा होऊन देखील या वाडयांना साधा रस्ता उपलब्ध होऊ शकला नाही. तेव्हा या वाड्यांना रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा आदिवासी समाजाने आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको केले. पण प्रशासकीय मंजुरीशिवाय त्यांच्या पायी रस्ता काही लागला नाही. बेकरेवाडी, किरवलीवाडी, असालवाडी, नाण्याचा माळ, मण्याचा माळ यासह १२ वाड्या रस्त्याविना संघर्षमयी जीवन जगत आहेत. तर एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेताना झोळी करून न्यावी लागत असल्याने त्यात वेळ जाऊन रुग्ण दगावण्याच्या घटना घडत असल्याने आदिवासी समाज संतप्त झाला आहे.

अशीच घटना दि. १५ जुलै रोजी आसलवाडी येथे घडली. आसलवाडी येथे राहणारे सांबरी कुटुंब हे शेतावर लावणीच्या कामला गेले होते. दुपारी काम करत असताना विठाबाई सांबरी यांना पायाला काहीतरी टोचल्यासारखं जाणवलं, मात्र त्यांनी विशेष लक्ष दिल नाही. त्या परत कामाला निघून गेल्या. सायंकाळी शेतावरून घरी आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी लगबग सुरु झाली. वाडीला रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी झोळी करत त्यांना जुमापट्टीपर्यंत आणले. तेथून वाहनाने नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, विठाबाई यांची प्रकृती खालावत असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना पुढे घेऊन जाण्यास सांगितले. ग्रामस्थ त्यांना पुढील उपचारासाठी नेत असतानाच नेरळमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने सांबरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे रस्त्याअभावी या भगिनीचा देखील जीव गेल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. विठाबाईंचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला नसून या मुर्दाड प्रशासनामुळे झाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया आदिवासी संघटनेचे अध्यक्ष जैतू पारधी यांनी दिली आहे.
दरम्यान, आजच्या प्रगत भारत देशात तब्बल १२ वाड्यांना रस्ता मिळू नये हि मोठी शोकांतिका असून आधी देखील केवळ उपचाराअभावी अनेक जीव गेले आहेत. जानेवारी २०२४ मध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन झालेल्या या १२ वाड्यांच्या रस्त्यावर साधी माती देखील ठेकेदाराकडून पडली नाही हे वास्तव आहे. तरी प्रशासन उघड्या डोळ्यांनी हे मृत्यू कुठवर पाहत राहणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
भारत स्वतंत्र होऊन ७६ वर्ष उलटली तरीही आमच्या आदिवासी वाड्यांना आजही रस्त्यांची कमतरता आहे. या ठिकाणी आजही आम्ही दगड धोंड्यात नाल्यातून वाट शोधत आपला घरचा प्रवास करत असतो. अशातच आसलवाडी येथे घटना घडली विठाबाई सांबरी यांना सर्पदंश झाला. तिला तात्काळ उपचार घेण्याकरिता नेरळ येथे प्राथमिक रुग्णालयात आणण्यासाठी आम्हाला रस्ता नसल्याने तिला डोळी करून माणसांच्या सहाय्याने जूमापट्टी गावापर्यंत आणावं लागलं. तिला उपचार घेण्याकरिता विलंब झाला. त्यामुळे आमच्या भगिनीला जीव गमवावा लागला. आज विठाबाईचा जीव गेला उद्या आणखीन कुणीतरी. किती लोकांचे प्राण घेणार हे प्रशासन? या हलगर्जीपणाला नेमकं जबाबदार कोण? असा आमचा सवाल आहे.
-जैतू पारधी,
अध्यक्ष, कर्जत तालुका आदिवासी जनजागृती विकास संघटना