विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कुंडलिका नदीवरील पुलावर पडलेला भला मोठा खड्डा अखेर पेव्हर ब्लॉक टाकून भरण्यात आला, यामुळे अपघाताचा धोका टळला असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गवरील कोलाड कुंडलिका नदीवरील पुलावर कोलाड बाजुकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुलाच्या टोकावर अनेक दिवसापासून भला मोठा खड्डा पडला होता. त्यामध्ये गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्यामुळे ह्या खड्ड्याचा वाहन चालकांना अंदाज येत नव्हता. यामुळे या खड्ड्यात मोठमोठी वाहने अडकून पडत होती. यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
कुंडलिका नदीवरील पुलावर पडलेला खड्डा अनेक वेळा खडी टाकून भरण्यात आला, परंतु पाऊस पडला कि खडी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाने खड्ड्याच्या बाहेर येत होती. यामुळे हा खड्डा अधिकच मोठा झाला होता. परंतु हा खड्डा पेव्हर ब्लॉकने भरल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाच्या जीवितास असणारा धोका टळला असल्याचे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.
