चोरट्यांच्या नजरा आता मोबाईल, मंगळसूत्र आणि सोन साखळ्यांकडे!
शशिकांत मोरे
धाटाव : सध्या रोखीने चालणाऱ्या अर्थव्यवस्थेकडून डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वळत असताना या प्रकारचे व्यवहार अधिक प्रमाणात प्रचलित आणि आवश्यक झाले आहेत. त्यामुळे सध्या डिजिटल व्यवहार वाढल्याने खिशात रोख रक्कम बाळगणाऱ्यांचे प्रमाणच कमी झाले आहे. डिजिटल व्यवहारांमुळे मोबाईलमध्ये असलेल्या ॲपच्या माध्यमातूनच अगदी १ रुपयांपासून ५० हजार ते लाख रुपयांपर्यंत वस्तूही खरेदी केल्या जातात. त्यामुळे रोख रक्कम बाळगण्याचा आता प्रश्नच येत नसल्यामुळे सध्या पाकीटमार मात्र दिसेनासे झाले आहेत. तर चोरट्यांनी आता मोबाईल, मंगळसूत्र आणि सोन साखळ्या चोरीकडे आपला मोर्चा वळविला असल्याचे पहावयास मिळत आहे.
डिजिटल व्यवहार ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे रोखीचा वापर न करता व्यवहार केले जातात. डिजिटल व्यवहारामध्ये मोठ्या आर्थिक कंपन्या आणि अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्र समाविष्ट आहेत. एखाद्या दुकानामध्ये डेबिट कार्ड स्वाइप करणे, ऑनलाइन खरेदीसाठी पैसे देणे किंवा ॲपवरून तुमच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करणे समाविष्ट आहे. त्यामुळे सध्या डिजिटल व्यवहार वाढल्याने खिशात रोख रक्कम बाळगणे अनेकांनी कमी केले आहे. चलनात सुट्ट्या पैशांचीही कमतरता भासू लागली आहे, त्यामुळे हातात असलेल्या पाचशे, दोनशेच्या पूर्ण पैशांची खरेदी करूनच व्यवहार पूर्ण करावा लागत आहे.
दैनंदिन व्यवहाराचे परिमाण बदलले आहेत. यात युवा वर्ग, मध्यमवयीन नागरिक डिजिटल व्यवहारावरच भर देत आहेत. प्रवासाला जातानाही कुणी फारशी रक्कम पाकीटमध्ये ठेवत नाही. या पाकिटाची जागा आता मोबाईलने घेतली आहे. त्यामध्येच बँकेचे व्यवहार म्हणजेच रोख पैसे, अत्यावश्यक असलेली कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये ठेवले जातात. यातील कागदपत्रांनाही सर्वत्र मान्यता देण्यात आली आहे. याच कारणाने अनेकांनी पाकीट बाळगणे बंद केले आहे.
त्यामुळे बहुतांशी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यासारख्या पाकीटमारीच्या घटनाच घडत नसल्याचे दिसून येत आहे. तर पाकिटमार सध्या गायब झाल्यासारखी स्थिती आहे. या उलट चोरटे मंडळी पाकीटाऐवजी आता मोबाईल कसा लंपास करता येईल याच शोधात असतात. त्यामुळेच पाकीटमारीच्या घटना जवळपास नाहीशा झाल्या आहेत. तर मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणावरून मोबाईल बरोबर मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे.