रायगड : जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव आता बदलून “रायगडवाडी” करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत घोषणा केली असून, लवकरच कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे.
रायगड किल्ला, जो महाराष्ट्राच्या स्वराज्याची राजधानी होता, याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी छत्री निजामपूर या नावाला आक्षेप घेत, ते रायगडवाडी असं बदलण्याची मागणी केली. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, “स्वराज्याच्या भूमीवर निजामाच्या खुणा कशाला हव्यात?”
या नावबदलाच्या निर्णयावर स्थानिकांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नागरिकांनी बदलाचे स्वागत केले, तर काहींनी निजामपूर या नावामागील ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन विरोध व्यक्त केला आहे.