पेण । विनायक पाटील
येथील डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवली येथील मॉडेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्राध्यापक महेश थोरात व माधव नाईक उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी भूषविले. प्रतिमा पूजन आणि संस्था प्रार्थनेने कार्यक्रमाचा दिमाखदार आरंभ करण्यात आला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. महेश थोरात यांनी कलेचे महत्त्व अधोरेखित केले. “महाराष्ट्राची लोककला आपल्या धमन्यांतून वाहत असून तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. डिजिटल युगामध्ये या लोककलांना धोका संभवू शकतो, तरीही विद्यार्थ्यांनी या वारशाची जोपासना करावी,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच आपण चित्रपटसृष्टीच्या जवळ राहत असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रा. थोरात यांनी स्त्री वेशभूषा धारण करून विविध लावण्यांवर सादर केलेल्या अप्रतिम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांची अदाकारी पाहून विद्यार्थी व शिक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
दुसरे प्रमुख पाहुणे माधव नाईक यांनी “विद्यार्थी हा ध्येयनिष्ठ असावा आणि त्याने कठोर परिश्रमातून आपल्या भविष्याला आकार द्यावा,” असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी महाविद्यालयाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “प. पू. बापूजींनी महाविद्यालयांना संस्कार केंद्र मानले असून विद्यार्थी हेच आमचे दैवत आहेत. बापूजींच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करणे आवश्यक आहे. आजच्या काळात स्पर्धा करताना ‘टेक्नोसॅव्ही’ होणे ही काळाची गरज आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनायक पवार यांनी केले, तर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष गुरव यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. शेवटी डॉ. श्रीकांत महादाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
