• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐतिहासिक किल्ले रायगडावरील २५ घरे सौर ऊर्जेने उजळली; पिढ्यानपिढ्या गडाचे रक्षण करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनात प्रकाशाचे पर्व

ByEditor

Feb 16, 2026

महाड । मिलिंद माने
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर आज एक अत्यंत भावनिक आणि समाधानाचा क्षण अनुभवायला मिळाला. गडाच्या अस्तित्वापासून पिढ्यानपिढ्या या पवित्र भूमीचे जतन आणि संरक्षण करणाऱ्या २५ कुटुंबांच्या घरांमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून कायमस्वरूपी प्रकाश पोहोचला आहे. अनेक वर्षांपासून अंधारात राहणाऱ्या या कुटुंबांची घरे आता सौर दिव्यांनी लख्ख उजळून निघाली आहेत.

किल्ले रायगड हा केवळ इतिहास नाही, तर ती एक जिवंत प्रेरणा आहे. या गडावर वास्तव्यास असलेली ही २५ कुटुंबे ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्या या अमूल्य योगदानाचा सन्मान म्हणून ‘सीएसआर’ (CSR) निधीच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.

आमदार गोपीचंद पडळकर, संजय कुलकर्णी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “स्वराज्याच्या राजधानीत राहणाऱ्या या कुटुंबांच्या आयुष्यात उजेड निर्माण करणे, हा स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेल्या सेवेचा छोटासा सन्मान आहे.”

हा प्रकल्प साकारण्यासाठी Filtgard Filters Private Limited आणि MyRide Energy Private Limited या संस्थांनी विशेष सहकार्य केले. या संस्थांच्या सामाजिक बांधिलकीमुळेच रायगडावरील दुर्गम भागात वीज पोहोचवणे शक्य झाले आहे. वर्षानुवर्षे नैसर्गिक आपत्तींचा सामना करत गडाची सेवा करणाऱ्या या कुटुंबांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला असून, गडावर आता खऱ्या अर्थाने प्रकाशाचे पर्व सुरू झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!