• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी अवस्थेत तरुण तीन तास उपचाराविना विव्हळत

ByEditor

Jul 21, 2025

सार्वजनिक आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार

डॉक्टर सुट्टीवर; 108 व 102 रुग्णवाहिका उपलब्ध नाही

अमुलकुमार जैन
रायगड :
पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी रविवारी (ता. 20) दुपारी आदिवासी समाजाचा रोशन सत्यवान पवार हा तरुण आला होता. मात्र यावेळी येथे एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. अडीच ते तीन तासानंतर खवली येथील डॉक्टरांनी येऊन या तरुणाला तपासले व इथे उपचार करणे शक्य नसल्याचे सांगून या तरुणाला जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचारासाठी नेण्यास सांगितले. मात्र 108 व 102 रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध झाल्या नाहीत. नाईलाजाने पदरमोड करून खाजगी रुग्णवाहिकेतून या तरुणाला अलिबाग येथे नेण्यात आले.

रोशन पवार याच्या कानातून रक्त येत होते. पाठीवर अनेक मारहाणीच्या खुणा देखील होत्या. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हता. आरोग्य केंद्रात केवळ दोन परिचारिका उपस्थित होत्या. डॉक्टर अभावी रुग्णाला तीन तास ताटकळत राहावे लागले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिकन सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सांगितले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर आहेत. त्यापैकी डॉ. प्रियंका गवळी या रीतसर रजेवर होत्या. तर डॉ. अभिजीत तळेकर हे स्वतःचा मोबाईल बंद करून गायब होते. याबाबतीत अमित गायकवाड यांनी परिचारिका यांना विचारणा केली असता आम्हाला डॉक्टर कुठे आहे. यावेळी माहिती नाही असे सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याच्या समवेत असलेल्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. पर्यायाने उपस्थित असलेल्या परिचारिकांनी खवली येथील डॉक्टर शुभम चिवेगावे यांना फोन केला. यानंतर दहा मिनिटांनी ते आले. रुग्णाला तपासून इथे उपचार होणार नाही, म्हणून अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात पाठवले.

शासकीय रुग्णवाहिका बेभरवशाच्या

शासनाने नेमलेल्या 108 व 102 या नंबरवरील दोन्ही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सुद्धा रुग्णाचे हाल झाले. 108 क्रमांकाची रुग्णवाहिका खोपोली येथून संध्याकाळी सात वाजता उपलब्ध होणार होती. तसेच पालीतील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका माणगाव येथे गेली होती व तेथून घरोशीवाडी येथे बस पलटी झाल्याने तिथे रुग्णांना आणण्यासाठी गेली होती. त्यामुळे तिलाही पालीत येणे शक्य नव्हते. तर 102 क्रमांकाची रुग्णवाहिका ही रुग्णाला घेऊन गेली होती, त्यामुळे तिलाही उशीर होणार होता. या जखमी तरुणावर लवकर उपचार होणे गरजेचे होते. कारण आधीच त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन तास ताटकळत राहावे लागले होते. परिणामी त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाजगी रुग्णवाहिकेतून अलिबाग येथे नेले.

आरोग्य अधिकारी नॉट रिचेबल

याबाबत अमित गायकवाड यांनी तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी व डॉक्टर अभिजीत तळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल होते.

आम्ही ज्या-ज्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतो तेव्हा आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या ठिकाणी कधीच डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात. काही दिवसांपूर्वी मी एका रुग्णाला घेऊन आलो होतो, डॉक्टर उशिरा आल्याने तो रुग्ण दगावला. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी.
-विश्वास वाघमारे,
अध्यक्ष, आदिवासी समाज सुधागड

तालुका गटविकास अधिकारी म्हणून माझ्याकडे जेव्हा ही तक्रार आली तेव्हा मी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मडवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन बंद दाखवला. त्यानंतर मी आरोग्य विस्तार अधिकारी धनंजय पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांना सांगितले की, तेथे तात्काळ एखादा डॉक्टर उपलब्ध करा.
-लता मोहिते,
गटविकास अधिकारी सुधागड.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!