• Fri. Mar 13th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात धोकादायक लोखंडी वीज खांबांची संख्या वाढली; पावसाळ्यात रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा

ByEditor

Jul 21, 2025

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांमध्ये गंजलेले आणि सडलेले लोखंडी वीज खांब उभे असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात अशा सडलेल्या खांबांमुळे विद्युत अपघातांचा धोका वाढला असून, स्थानिक नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

वीज वाहक लोखंडी खांब हे विद्युत तारा जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी वापरले जातात. मात्र, उरण तालुक्यात अनेक ठिकाणी हे खांब गंजून कमजोर झाले असून, कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या खांबांजवळून जाताना नागरिक, विशेषतः मुके प्राणी, यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

उरणसह परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी वेळोवेळी महावितरणकडे लेखी तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेता, महावितरणचे अभियंते व कर्मचारी बिल्डर, गोदाम मालक यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात अधिक लक्ष घालतात, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

उरण हे मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असूनही येथे महावितरणमधील कार्यपद्धतीत अनास्था व भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले असल्याचं चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा विभागाचं खातं असलं, तरी उरणसारख्या भागातील समस्यांकडे लक्ष देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर महावितरणचे उरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी सांगितले की, “उरण तालुक्यात कोणत्या गावात किती विद्युत वाहक लोखंडी खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत, याची माहिती घेत आहोत. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला जाईल.”

सध्या पावसाळा सुरू असल्याने विजेच्या गंजलेल्या खांबांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे, आणि प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!