छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फारोळा गावात एक अनोखी आणि अंमळ गोंधळात टाकणारी घटना घडली आहे. गावातील एका गायीच्या वासराला आठ दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याच्या घटनेनंतर वासराचा मृत्यू झाला. वासरू ज्या गाईचे दूध पित होते, त्या गाईच्या दुधाचा गावात नियमित वापर होत असल्याने गाईला इन्फेक्शन झालं असावं आणि त्यामुळे आपल्यालाही रेबीज होईल, अशी अफवा गावभर पसरली.
दहशतीत गावकरी, रुग्णालयात अफवेमुळे रांगा
ही अफवा इतकी तीव्र होती की शुक्रवारपासून संपूर्ण गावातील नागरिक बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र एवढ्या संख्येतील नागरिकांना इंजेक्शन पुरवठा करणे शक्य नसल्याने रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
जुनी घटना पुन्हा आठवली
या अफवेमागे वर्षभरापूर्वी घडलेली एक घटना कारणीभूत आहे. त्यावेळीही एका वासराला कुत्रा चावला होता आणि त्याच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाचा काही दिवसांनी मृत्यू झाला होता. त्यामुळे ही घटना गावकऱ्यांच्या आठवणी ताजी करत पुन्हा भीतीचा माहौल निर्माण झाला आहे.
डॉक्टरांचं स्पष्टीकरण
स्थानिक डॉक्टरांनी सांगितलं की, “आजपर्यंत शेकडो लोकांनी रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतले आहेत, पण प्रत्यक्षात गावात सध्या रेबीजचा कोणताही सक्रिय धोका आढळलेला नाही.” त्यांनी घबराट टाळण्याचं आणि फक्त आवश्यकतेनुसार उपचार घेण्याचं आवाहन केलं आहे.