घन:श्याम कडू
उरण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जसखार ग्रामपंचायत सरपंच काशीबाई हासुराम ठाकूर यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सरपंच म्हणून राहण्यास अपात्र (निरर्ह) ठरविले आहे. तशा प्रकारचा आदेशही पारित करण्यात आल्याचे समजते.
जसखार ग्रामस्थ गर्दीष सुरेश म्हात्रे यांनी सरपंच काशीबाई ठाकूर यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर सुनावणी होऊन महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुबंई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १४ ज (३) नुसार विवाद अर्जानुसार अर्जदार गर्दीष म्हात्रे यांचा अर्ज मान्य करून सरपंच काशीबाई हासुराम ठाकूर यांना सरपंच म्हणून राहण्यास अपात्र (निरर्ह) ठरविण्यात आले आहे. तशा प्रकारचा निर्णय जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी लेखी दिला असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे.