विनायक पाटील
पेण : खासदारकीच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते आमदारकीच्या निवडणुकीचे. पेण, पाली, सुधागड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पेणचे शिवसेना तालुकाप्रमुख व उद्योजक जगदीश ठाकुर यांच्या नावाला पक्षश्रेष्ठी व शिवसैनिकांनी पसंती दिल्याचे समजते. जगदीश ठाकुर यांनी पेण तालुक्यात तसेच पाली, सुधागडमध्ये पक्ष वाढवण्यासाठी खूप मोलाचे काम केलेले आहे. तसेच तळागाळातील घटकापर्यंत पोहोचून गोरगरिबांच्या हाकेला धावणारा व वेळप्रसंगी सहकार्य करणारा व्यक्ती म्हणजेच जगदीश ठाकुर अशी त्यांची ख्याती आहे.
पेण-पाली-सुधागड विधानसभेतून आमदारकीसाठी चर्चेत वैकुंठ पाटील, निलिमा पाटील, अतुल म्हात्रे, प्रसाद भोईर, प्रितम पाटील, विष्णूभाई पाटील, किशोर जैन यांची नावे पुढे आलेली असतानाच आता जगदीश ठाकुर यांच्या नावाची चर्चा झाल्याने नक्की आमदारकीचे तिकीट कोणाला मिळणार? कोण विजयी होणार? हा प्रश्न निर्माण झाला असून आता आमदारकीची निवडणूक नक्कीच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.