अनंत नारंगीकर
उरण : उरण, पनवेल तालुक्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्याचा फटका सामान्य नागरिक, दुकानदारांनाही बसत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सर्वत्र दमदार पाऊस पडत असून विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्याचा फायदा चोरांनी उठवत ओवळे गावात धुमाकूळ घालत एकाच रात्रीत चार घरात घुसून चोरी करत लाखो रुपयांचा माल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेसंदर्भात पोलीसांना खबर देण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उरण पनवेल तालुक्यात या अगोदर चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. मात्र, पोलीसांच्या तपास यंत्रणेमुळे काही अंशी चोरीच्या घटनांना लगाम बसला होता. मात्र, सध्या पावसाचा जोर आणि त्यात सातत्याने खंडित होणारा विद्युत पुरवठा याचा फायदा सध्या भुरट्या चोरांनी उठविला आहे. त्यातच नुकताच ओवळे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत रहिवाशांच्या बंद घरातील दरवाजाच्या कडी, लॉक तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील, इतर ठिकाणावर ठेवलेले पैसे, मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत. तरी पनवेल तालुक्यातील घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल व उरण तालुक्यातील रहिवाशांनी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे होणाऱ्या सततच्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या जयवंती गोंधळी यांनी केले आहे.
