रोह्यात मुस्लिम बांधवांकडून हत्येचा जाहीर निषेध
यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे व सबरीन नेवडेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी
शशिकांत मोरे
धाटाव : उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद आज रोह्यामध्येही उमटले. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावीत या मागणीकरिता व घटनेचा निषेध करण्यासाठी रोह्यामधील सकल हिंदू समाजातर्फे मंगळवारी मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये रोह्यामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उरण तालुक्यातील सातराठी येथील यशश्री शिंदे आणि सीबीडी बेलापूर येथील अक्षता म्हात्रे यांची काही दिवसांपूर्वी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले होते. तर मुस्लिम समाजानेही संबंधित मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे.
रोह्यात शहरातील राममारुती चौकात आंदोलन करून मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष प्रदीप (अप्पा) देशमुख, राम नाकती, मयूर दिवेकर, महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, मकरंद गोविलकर, राजेश काफरे, चंद्रकांत पार्टे, प्रशांत देशमुख, रोशन चाफेकर, आदित्य कोंढाळकर, ॲड. हर्षद साळवी, जयेश छेडा, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा काफरे, अरुंधती पेंडसे, समिधा सकपाळ, प्राजक्ता चव्हाण, स्वरांजली शिर्के, ॲड. मयूरा मोरे आदींसह रोहेकर नागरिक, पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
राम मारुती चौक, नगरपालिका, बाजारपेठ, तीनबत्ती नाका या मार्गाने मुकमोर्चा काढण्यात आला. यशश्री शिंदेची निर्घृण हत्या ही घटना गांभीर्याने घेऊन आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी रोहेकरांच्या वतीने तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे उपस्थित होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, रोह्यातील मुस्लिम समाजानेही यशश्री शिंदे, अक्षता म्हात्रे व सबरीन नेवडेकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली.