विनायक पाटील
पेण : पंडित भीमसेन जोशी यांचे पट्ट शिष्य पंडित आनंद भाटे हे पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आयोजित भजनामृत 2024च्या बक्षीस वितरणासाठी पेणमध्ये येणार आहेत.
आनंद यांचा जन्म इ.स. १९७१ मध्ये पुण्याच्या भाटे कुटुंबात झाला. त्यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, तिच्याद्वारे त्यांनी अनेक संगीत नाटके बसविली होती. आनंद यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. यशवंत मराठे यांच्याकडेही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी इ.स. १९८१ म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला. पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे आनंद भाटे हे १५ वर्षे संगीत शिकले.एक लहान मुलगा बालगंधर्वाची नाट्यगीते हुबेहूब गातो हे पाहून लोक आनंद भाटे यांना आनंद गंधर्व म्हणू लागले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आले. सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपले गायन सादर केले आहे. बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी अनेक गाणी गायिली असून त्यातील अनेक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत. पंडित भीमसेन जोशी आणि बालगंधर्व हे त्यांचे आदर्श आहेत. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आहेत. नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला पंडित भीमसेन जोशी यांनी “आनंद भाटे”, असे दूरदर्शनवरील एका मुलाखतीत सांगितले होते.
भाजप सांस्कृतिक सेल तर्फे विधानसभा मतदारसंघात भजनामृत स्पर्धेचे दिनांक ५, ६, ७ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण पंडित आनंद भाटे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान रायगड भाजपा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या आग्रहाखातर व सतीश धारप यांच्या स्नेहापोटी पंडित आनंद भाटे बाप्पांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये येणार आहेत.