शशिकांत मोरे
धाटाव : रोहा एमआयडीसीमधील बेक केमिकल कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच त्यांना बाप्पा पावला आहे. जनरल मजदूर सभेने कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर करार केला असून १२ ते १५ हजार रुपये एवढी पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून जनरल मजदूर सभा कायम कामगारांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मे. बेक केमिकल प्रा. लि. या कंपनीत जनरल मजदूर सभा, ठाणे ही मान्यताप्राप्त युनियन ३० वर्षे नेतृत्व करीत आहे. प्रदीर्घ वाटाघाटीनंतर प्रत्येक कायम कामगारास १३,२००/- रुपये अशी भरघोस पगारवाढ मिळवण्यात युनियनला यश आले आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांच्या पुढाकाराने याबाबतचा करार करण्यात आला. या कराराचे फायदे कंपनीतील ५० कामगारांना मिळणार आहेत. हा करार १ एप्रिल २०२२ पासून ३१ मार्च २०२५ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
करारावर संघटनेच्यावतीने सरचिटणीस संजय वढावकर, अध्यक्षा संज्योत वढावकर, उपाध्यक्ष शामकांत जोशी, सेक्रेटरी जगदीश उपाध्याय, संघटक सचिव सुहास खरिवले व कंपनीच्यावतीने डायरेक्टर जयेश शाह, चीफ फायनान्स ऑफिसर अनिल वोरा, डायरेक्टर मिलिंद राजूरकर, फॅक्टरी हेड समीर पवार, जनरल एचआर मॅनेजर अतुल आठवले, राहुल तलाठी, कामगार प्रतिनिधी परशुराम महाबळे, सूर्यकांत शिगवण, विशाल चौलकर, तुकाराम शिंदे, राजेश बामुगडे आदींनी सह्या केल्या, अशी माहिती संघटक सचिव सुहास खरिवले यांनी दिली.