मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण
गणेश प्रभाळे
दिघी : म्हसळा तालुक्यातील गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी करता यावी यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण गुरुवारी (ता. ८) महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गरोदर महिलांनी या मोफत सोनोग्राफी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सोळा आठवड्यापर्यंत गरोदर असणाऱ्या महिलांची दर शुक्रवारी दुपारी २ ते ५ यावेळेत तपासणी होणार आहे.
रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. महेश मेहता यांनी यावेळी प्रास्ताविक करत रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कि, टप्प्याटप्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची पूर्तता करू. काही दिवसात येथे डायल्यासिस सेंटर उभारून येथील रूग्णांना होणारा त्रास कमी करू असेही त्यांनी सांगितले.
येत्या १३ ऑगस्ट रोजी श्रीवर्धन येथे होणाऱ्या आरोग्य शिबीरात रुग्णांनी सहभाग घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याचे आवाहन तटकरे यांनी केले. म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रोज शंभर च्या आसपास रुग्ण तपासणी होते. गेल्याच वर्षी येथे अदिती तटकरे यांच्या हस्ते अद्ययावत प्रसूतिगृहाचे देखील उदघाटन करण्यात आले होते. गरोदर महिलांना लागणाऱ्या आवश्यक सुविधा आता म्हसळा रुग्णालयात मिळणार असल्याने उठसुठ रेफर व इतरत्र जाण्याचे त्रासही आता वाचणार आहे.
सोनोग्राफी कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाला श्रीवर्धन प्रांताधिकारी अधिकारी महेश पाटील, तहसीलदार समिर घारे, गटविकास अधिकारी माधव जाधव, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष आवटी, स्त्रीरोगतज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सोनाली जुन्नरकर- करंबे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्रीरोग तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
म्हसळा येथे स्थायिक स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. सोनाली जुन्नरकर-करंबे यांनी रुग्णालयात सोनोग्राफी तपासणी करण्याचे मान्य केल्याने हि सेवा गरोदर मातांना मिळणार आहे. यामुळे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने तज्ज्ञाचे मार्गदर्शन आता मातांना मिळणार आहे.