• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अंबानीच्या एसईझेडनंतर अदानीचा उरणच्या जमिनींवर डोळा!

ByEditor

May 20, 2023

शेतकऱ्यांना एकत्र येऊन लढण्याचे मनोज पाटील यांचे आवाहन

विठ्ठल ममताबादे
उरण :
अदानी ग्रुपच्या ब्ल्यू स्टार ह्या कंपनीला सारडे, वशेणी, पुनाडे येथील सुपीक जमिनी हव्यात. लॉजिस्टीक वापराकरिता ह्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कमिशन बेसवर एमआयडीसीची नेमणुक केली आहे. म्हणजे ह्या भांडवलदाराला आपली जमीन आवडली म्हणून सरकार इथल्या स्थानिकांना विस्थापित आणि भकास करणार. बरं आपल्या जमिनीचे भाव कोण ठरवणार? तर उद्योगमंत्र्याची हायर टॉपर कमेटी. म्हणजे वरून खालपर्यंत मलिदा खात खात शेतकऱ्यांना चारा चारणार. त्यामुळे एमआयडीसीच्या भूसंपादनाला सारडे, वशेणी, पुनाडे येथील शेतकऱ्यांचा शेवटपर्यंत विरोध असेल असे सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी स्पस्ष्ट केले.

शुक्रवार, दि. 19 मे 2023 रोजी पनवेल येथे असलेल्या प्रांत अधिकारी दालनात (कार्यालयात) उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील एमआयडीसी बाधित सारडे, वशेणी, पुनाडे येथील शेतकऱ्यांचा एमआयडीसी प्रकल्पसाठी जमिन मोजणीला असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मिटिंग झाली. या मिटिंगसाठी एमआयडीसीचे अधिकारी तसेच उरणचे आमदार महेश बालदी हजर होते. जमिनीचा निर्धारित भाव काय देणार, बेस रेट कसा ठरवणार, विस्तारित गावठाणातील घरे कायम करण्यासाठी काय धोरण निश्चित करणार याबाबतीत कोणतेही ठोस उत्तर एमआयडीसीचे अधिकारी देउ शकले नाहीत. शेतकऱ्यांनी आपल्या नैसर्गिक वाढीपोटी आपल्या खाजगी जागेत बांधलेली राहती घरे शासन अतिक्रमण समजून अनाधिकृत ठरवू पहात असेल तर आमचा पूर्ण विरोध असेल. यावर स्थानिक आमदार, खासदार यांची काय भूमिका आहे ही त्यांनी स्पष्ट करावे. या विभागातील सुपीक जमिनी घेण्याऐवजी एसईझेडमधील जमिनी, सीआरझेडच्या जमिनी, ओसाड व पडीक जमिनी एमआयडीसीने संपादित करून अदानीच्या घश्यात घालाव्यात अशी भावना संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

सर्व शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता एमआयडीसीसाठी होणारी जमीन मोजणी तूर्तास मागे घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे शासनाला एक पाऊल मागे जावे लागले. अंबानीच्या एसईझेडला जसे एकत्र येऊन हद्दपार केले त्या पद्धतीने सारडे, वशेणी, पुनाडे गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उरणमध्ये शासनाच्या माध्यमातून भूसंपादन करणाऱ्या अदानी समुहाच्या ब्ल्यू स्टारला हद्दपार करू या असे आवाहन सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले. जमिनी सोबत आपली विस्तारित गावठणातील घरे ह्या भांडवलदारांपासून वाचवायची असतील तर गावठाण विस्तार हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे आणि सारडे ग्रामविकास समितीने गावठाण विस्ताराचा जो प्रयत्न सुरू केला आहे तसाच प्रयत्न इतर गावांतील शेतकरी, ग्रामस्थांनी करावा असे देखील आवाहन मनोज पाटील यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!