विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील सुप्रसिद्ध काष्ठ शिल्पकार तथा अंबिका सॉ मिलचे मालक रमेश गणपतराव घोणे यांचे बुधवार, दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ७१ वर्षाचे होते. ते अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वांना परिचित होते.
उत्कृष्ट काष्ठ शिल्पकार रमेश घोणे यांच्या काष्ठ शिल्पाच्या वस्तूंचे प्रदर्शन रोहा तालुका पत्रकार संघाने कोलाड येथे आयोजित केले होते. आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी केले हॊते. तसेच रमेश घोणे यांनी तयार केलेल्या काष्ठशिल्प वस्तूंचे प्रदर्शन रायगड जिल्ह्यासह पुणे, मुंबईसह विविध स्तरावर आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या कोलाड येथील वस्तु संग्रहालयास त्यांनी तयार केलेले शिल्प पाहण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक शाळेतील असंख्य विद्यार्थी तसेच शिल्पप्रेमी भेट देतात.
विशिष्ट लाकडातून घोणे यांनी बनवलेली कोरीव कला अशा काष्ठशिल्प कलेचे अनेकांनी कौतुक करत त्यांना विविध सामाजिक संस्थानी सन्मानित केले होते. असे महान काष्ठ शिल्पकार रमेश घोणे यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार आदी दुःखी परिवार उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली व मोठा घोणे परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य विधी रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या राहत्या निवास्थानी आंबेवाडी कोलाड येथे संपन्न होणार आहेत.
