• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वैकुंठ रवीशेठ पाटील दहिहंडी; लाखोंच्या बक्षिसासाठी मनोऱ्यांची स्पर्धा

ByEditor

Aug 26, 2024

पेण ग्रामीण भागात रंगणार ‘थरार’

विनायक पाटील
पेण :
रायगड जिल्हातील पेण ग्रामीण भागात सर्वात भव्य आणि लोकप्रिय असणारी युवाशक्ती वैकुंठ रवीशेठ पाटील दहीहंडीचा थरार यावर्षी रंगणार असून मोठ्या जल्लोषात होणारी ही दहीहंडी तीन लाखाची बक्षिसाची फुटणार आहे. या दहीहंडी बरोबर ग्रामीण भागातील तांबटशेत, पेण वाशी, वडखळ अश्या तीन गावात १ लाख १ हजार १११ रुपये असे तीन ग्रामीण भागातील मिळून ३ लाख ३ हजार ३३३ रू. असे भव्य रोख रक्कम व विविध बक्षिसे देण्यात येतील असे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. विविध ठिकाणच्या चौकात दहीहंडीचे मनोरे उभे राहणार असून यासाठी ही लाखोंची बक्षिसे ठेवली आहेत. मुंबई, पनवेल, पेण येथील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख ३ हजार ३३३ रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी यंदाही गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला पेणचे आमदार रवीशेठ पाटील, खा. धैर्यशील पाटील, वैकुंठ पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख ३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

वैकुंठशेठ पाटील मित्र मंडळ दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये, तर सात थर रचून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष उपाय योजना केली आहे. एखादा गोविदा जखमी झाल्यास त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असतील. रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम असणार यंदाचे आकर्षण

दरवर्षीप्रमाणे तांबटशेत, वाशी गाव, वडखळ मैदानावर युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले आहे. डिजे रणजितसह, उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. दहीहंडी फोडणारा सर्वात वरच्या थरावरील गोविंदा १४ वर्षावरील असावा या नियमाचे काटेकोर पालन केले जाणार आहे. प्रारंभी ढोलताशा पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

वैकुंठशेठ पाटील मित्र मंडळाचे दोनशे कार्यकर्ते नियोजन व सोहळ्यासाठी सज्ज!

वैकुंठशेठ पाटील दहीहंडी सोहळ्याचे चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. वैकुंठशेठ पाटील दहीहंडीच्या उ‌द्घाटन सोहळ्यासाठी आमदार रवीशेठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. वैकुंठशेठ पाटील मित्र मंडळ यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून युवाशक्तीचे सुमारे दोनशे कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी पेणवासियांनी दि. २७ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!