‘रायगड जनोदय’ युट्युब वाहिनीला ‘तेजोमय पुरस्कार’ जाहीर
भव्य कार्यक्रमात होणार सन्मान सोहळा
प्रतिनिधी
खालापूर : सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या खालापूर येथील दिलासा फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना, विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रायगड मावळ पत्रकार संघाच्या, संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा होणार आहे.
दिलासा फाउंडेशनतर्फे मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, रस्ता सुरक्षा अभियान, पर्यावरण, आरोग्य शिबिर तसेच गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. प्रशासकीय, क्रीडा, पत्रकार, राजकिय,शिक्षण तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कामाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना दिलासा फाउंडेशन सन्मानित करणार आहे. प्रशासकीय सेवेत वाखण्याजोगी कामगिरी करणारे खालापूर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना यंदाचा ‘सहाय्यक फौजदार कै. महेश मधुकर कळमकर स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साप्ताहिकाची लोकप्रियता टिकवून वाचक वर्गांला खिळवून ठेवणारे रसायनी टाईम्सचे संपादक अनिल भोळे यांना ‘दीपस्तंभ’ पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील ‘गुरुजन गुणगौरव पुरस्कार’ शिक्षक राजाराम जाधव आणि ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून धनश्री ठकेकर यांची निवड झाली आहे. राजकारणात प्रभावी पती-पत्नी जोडी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या पद्मा पाटील आणि त्यांचे पती सुरेश दिनानाथ पाटील यांची ‘समाज रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
क्रीडा क्षेत्रात स्वाॅक्श प्रकारात अतुलनीय कामगिरी करणारी स्वामी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी दुर्गा पारधी हिला ‘रणरागिणी’ पुरस्कार, व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र काम करणारे आई-बाबा फाउंडेशनचे प्रवीण नवरे यांना ‘समाज उद्धारक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘युवा पत्रकार’ म्हणून दत्ता शेडगे तर डिजिटल मीडियात आपला ठसा उमटवणारी पत्रकार मंगेश पत्की यांची युट्युब वाहिनी ‘रायगड जनोदय’ला ‘तेजोमय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. वावंढळचे राकेश कदम यांना ‘झुंजार पत्रकार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपत्ती काळात मदतीला धावून जाणारे अपघातग्रस्त मदत पथकाचे विजय भोसले यांना ‘देवदूत’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडणार असल्याचे दिलासा फाउंडेशन आणि रायगड मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी सांगितले.