मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट
विनायक पाटील
पेण : मागील अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासव गतीने सुरु असुन दरवर्षी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असतो. याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी या महामार्गाची पाहणी केल्यानंतर आता या महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू असुन येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल याचे समाधान वाटत आहे.

पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या कामातील गोव्याकडे जाताना पेणपासुन पुढे या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर या महामार्गाची दुरवस्था पाहता ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य ते काम करण्याला प्राधान्य दिले असून आता महामार्गावरील खड्डे पक्क्या स्वरूपात भरले जात असून येत्या गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरून पूर्ण होतील यात शंका नाही. पेण तालुक्यातील कासूपासुन अगदी इंदापूरपर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या नाकीनऊ यायचे. मात्र आता हे खड्डे भरले जात असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

कामाच्या बाबतीत विचार केला असता पेण बस स्थानकाचे काम गेली अनेक वर्ष रखडलेले होते. मात्र रामेश्वर कंट्रक्शनने अवघ्या आठवडा भरात हे काम एवढ्या चांगल्या प्रतीचे केले आहे की या मुंबई-गोवा महामार्गाचे काम देखील त्यांनाच दिले तर वर्ष ते दीड वर्षात हे काम ते चांगल्या पद्धतीने पूर्ण करून प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल.
-निलेश कोळी
प्रवासी