घनःश्याम कडू
उरण : शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत करण्यात येणार होती. त्यासाठी उरण पोलिसांनी ठिकाणे निश्चित केली होती. शहरात यासाठी 85 कॅमेरे बसविण्यात येऊन त्यासाठी कन्ट्रोल रूमही बनविण्यात येणार असल्याची माहिती तत्कालीन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी डिसेंबर 2023 मध्ये दिली होती. त्याला आता जवळपास 9 ते 10 महिन्याचा अवधी उलटून व संबंधित अधिकारी वर्ग बदली होऊनही कोणतीच प्रगती झालेली दिसत नाही.
उरण शहराच्या कक्षा रुंदावू लागल्या आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, मात्र त्याची देखभाल दुरुस्ती वेळेत न झाल्याने ते निकामी झाले आहेत. उरण शहरातील वाढता बाजार आणि त्यामुळे होणारी गर्दी या गर्दीचा फायदा घेऊन होणार्या चोरीच्या घटना यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. द्रोणागिरी नोडमध्ये इमारतींचे जाळे विणले जात आहे. तसेच रेल्वे सुरू झाली आहे. यामुळे शहरात परप्रतियांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
शहरात एखादी घटना घडल्यानंतर गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. भविष्यातही उरणची लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा विचार करून उरण शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ववत ओएनजीसी प्रकल्पाच्या सहकार्याने करण्यात येणार आहेत. त्यासाठी शहरातील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात एकूण 85 कॅमेरे बसविण्यात येणार असून, लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती तत्कालीन उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी डिसेंबर 2023 मध्ये दिली होती. त्यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर राजेंद्र कोते पाटील यांची नियुक्ती झाली होती. काही महिन्यात त्यांचीही बदली होऊन आता पदभार जितेंद्र मिसाळ यांनी स्वीकारला आहे. अशा प्रकारे ओएनजीसी कंपनीच्या माध्यमातून उरण शहरासाठी 85 कॅमेरे बसविण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये मंजुरी मिळूनही आजच्या घडीला उरण पोलीस ठाण्याचे दोन वरिष्ठ अधिकारी बदलून तिसरे नवीन अधिकारी येऊनही आज जवळपास 9 ते 10 महिन्याचा अवधी उलटूनही यामध्ये कोणतीच प्रगती होताना दिसत नाही. मग नक्की घोडे अडले कुठे? असा सवाल यानिमित्ताने उभा रहात आहे.