क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, कौस्तुभ जोशी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणालगत सार्वजनिक बांधकाम विभागाची पडीक असलेली जागा आहे. सदर जागेचा विनियोग अन्य कोणत्याही कारणासाठी होत नसून ती जागा जर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी कायमस्वरूपी किंवा भाडेकरारावर उपलब्ध करून दिली तर संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व खेळाडूंना त्याचा फायदा होणार आहे. पेण नगरपालिकेच्या क्रीडांगणालगत पडीक असलेल्या जागेचा योग्य वापर सुद्धा याद्वारे होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सदर जागेचा प्रस्ताव तयार करून शासनाच्या नियमावलीत बसून सदरची जागा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ह्यावेळी दिले.
