आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीचे नियंत्रण करणे गरजेचे
प्रतिनिधी
नागोठणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता नागोठणे शहरात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे.
नागोठणे शहरातील मुख्य रस्ता अरुंद असून दररोज वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. यामध्ये रस्त्यावरील बेकायदा फेरीवाल्यांची भर पडू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत वाढ होऊन ती आता नित्याची झाली आहे. शहरातील वाढत्या वाहन संख्येबरोबर वाढत्या बेशिस्तीमुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. शहरात अनेक ठिकाणी वाहने उभी करून समोरील दुकानात खरेदी करणे, एखादे वाहन अडकून पडल्यानंतर ते बाहेर निघण्याची वाट न पाहता दुचाकी तसेच चारचाकी वाहन मध्येच घुसविणे आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यावर कहर म्हणजे वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनांवर न होणारी कारवाई. कारवाई करायला गेले की, हितसंबंध, राजकीय हस्तक्षेप हेही एक मुख्य कारण पुढे येऊ लागले आहे.

नागोठणे शहरात दररोज वाहतूक कोंडी होत असली, तरी शहरातील वाहतूक कोंडीत दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. संध्याकाळी तसेच विशेषतः रविवारी बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी सध्या वाढली आहे. काही वेळेस वाहतूक पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर असतानाही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने पोलीस यंत्रणाही वाहतूक कोंडी सोडवण्यात निष्कामी ठरत असल्याचे चित्र सध्या नागोठणे शहरात पाहावयास मिळत आहे.
नागोठणे शहरातील मुख्य बाजारपेठेत माल पुरवठा करणारी वाहने दुकानांच्या समोर उभे केल्याने वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. बाजारात दुचाकींसह खासगी वाहनांची वर्दळ सुद्धा वाढली असल्याने काही वेळेस वादाचे प्रसंगही उद्भवत असतात. त्यामुळे निदान सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी पाहता मोठ्या वाहनांना बाजारपेठेत प्रवेश बंद करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होताना दिसत आहे.
गणेशोत्सव व इतर सणांचा कालावधी लक्षात घेता वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असून वाहतुकीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
