नेरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीतून पाच गोवंशिय जनावरे ही कत्तलीसाठी नेली जात असल्याचा स्थानिक गोरक्षक याला संशय आल्याने व सदर घटनेची माहिती ही नेरळ पोलीसांना देताच नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्टमधील पोलिसांच्या व गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पाच गोवंशिय जनावरांचे प्राण वाचले. नेरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बोरगाव येथून कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे रस्त्याने पाच गोवंशिय जातीची जनावरे ही चारजण पायी नेत असल्याचे दिसताच तेथील एका गोरक्षकाने या संदर्भात त्यांना विचारणा केली असता, त्यापैकी एका तरुणाने साळोख येथे बैलांना घेवून चाललो आहोत असे सांगितल्याने गोरक्षकाला संशय आला. सदर गोरक्षकाने आपल्या मित्रांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून व आपल्या सोशल मीडिया ग्रुपवर ही माहिती दिली असता, काही गोरक्षक तरुण यांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्याचे कळंब आऊट पोस्ट पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची माहिती देताच पोलिस हे तत्काळ घटनास्थळी पोहचले मात्र तेथे कोणीही व्यक्ती बैल घेवून जात नसल्याचे पोलीस व गोरक्षक यांना दिसल्याने, पोलीस व गोरक्षक यांनी कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जावून पाहणी केली असता, पाच गोवंशिय जातीची जनावरे ही गवताच्या रस्त्याने चार तरुण हे आडवाटेने साळोख गावाकडे जात असल्याचे दिसून आल्याने, पोलीस व गोरक्षक यांनी त्या चार तरूणांना अडवून सदर पाच गोवंशिय जातीची जनावरे ही कत्तलीसाठी नेत आहेत काय? असा प्रश्न विचारला. चारही तरुणाची बोबडी वळली असल्याने, पोलीसांनी सदर चार तरुणांसह पाच गोवंशिय जातीच्या जनावरांना ताब्यात घेत कळंब आऊट पोस्ट येथे नेऊन त्या चार तरूणांची अधिक चौकशी केली असता, बोरगाव भागातून ही पाच गोवंशिय जातीची जनावरे ही कत्तलीसाठी साळोख येथे घेवून चाललो असल्याचे कबूल केले आहे.
सदर पाच गोवंशिय जातीची जनावरे ही नर जातीची असुन, त्यापैकी तीन नर जातीची जनावरे ही प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे असून अन्य एक २५ हजार रुपये किमतीचा आहे. पोलिसांनी कत्तलीसाठी बैल नेत असल्या प्रकरणी तसेच अवैध प्रकारे वाहतूक केली जात असल्याने व सदर गोवंशिय जातीच्या जनावरांच्या आरोग्य तपासणी प्रमाणपत्र व खरेदी केल्याची पावती नसल्याने चार तरुणांविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गु. र. नं. १७९ / २०२४, भारतीय न्याय संहिता २०२३ चे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम ५(ब),९चे उल्लंघनप्रमाणे ३०३(२),(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर ताब्यात घेतलेल्या चार तरूणांपैकी एक हा विधी संघर्षग्रस्त बालक असून, साळोख गावातील शगफ बुबेरे, अजय चंद्रकांत चवर, मनेश अशोक वाघ या तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन, सदर प्रकरणाचा तपास पोलीस उप निरीक्षक वसावे करीत आहेत.
