गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावर लखलखाट होणार; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा कोलाड-रोहा राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूनी पथदिवे बसविण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मार्किंग केली होती, परंतु या मार्किंगला पोल बसाविले नव्हते. यामुळे या मार्गावर अंधार असल्यामुळे चोरीचे प्रकार तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असल्याची बातमी रायगड जनोदयने प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर १५ दिवसात याची दखल घेऊन कोलाड-रोहा मार्गावर पथदिवे बसविण्याचे काम जलदगतीने सुरु करण्यात आले असुन, दोन ते तीन दिवसात म्हणजे गणेश उत्सवाच्या पूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याने प्रवाशी वर्गाकडून ‘रायगड जनोदय’चे आभार व्यक्त केले जात आहेत.
कोलाड-रोहा मार्गावर धाटाव औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ सुरु असते. दुसऱ्या पाळीतील सुटणारे कामगार तसेच रात्रपाळीला जाणारे कामगार यांची दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या ही मोठया प्रमाणात असुन या मार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठ मोठी झाडे आहेत. शिवाय या मार्गाच्या रस्त्याचे काम अतिशय उत्तम प्रकारचे झाले आहे. यामुळे या मार्गावर सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ नये म्हणून रस्त्याला जागोजागी गतिरोधक बसविले आहेत. परंतु, या रस्त्यावर अंधार असल्यामुळे येणारी जाणारी वाहने दिसत नसल्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत.
कोलाड रोहा मार्गावर पथदिवे नसल्यामुळे चोरीचे प्रकार देखील वाढले असुन या मार्गावरून एक महिन्यांपूर्वी मिथुन जैन यांची १३ हजार रुपयांची सायकल, तर आंबेवाडी येथील रामदास लोखंडे यांच्या पानटपरीतुन रोख रक्कम व माल चोरीला गेला होता. पालेखुर्द येथील टपरी फोडून माल चोरीला गेल्याचीही घटना घडली होती. याला मुख्य कारण या मार्गावर पथदिवे नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेत चोरी होत असुन गणेश उत्सवाच्या अगोदर या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात होती. यासंदर्भात रायगड जनोदयने वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीचा परिणाम दिसून आला असून एक ते दोन दिवसात या मार्गावर पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण होईल. यामुळे हा मार्ग प्रकाशमय होईल व जनतेच्या अनेक अडचणी दूर होतील.
