श्री रत्नेश्वरी मंदिर जसखार येथे जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध
अधिकाऱ्यांना जमिनीचे मोजमाप न करताच फिरावे लागले माघारी
विठ्ठल ममताबादे
उरण : तालुक्यातील जसखार ग्रामपंचायत हद्दीत अधिकृत बांधकाम व अनधिकृत बांधकामाचा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. अधिकृत बांधकाम कोणते? व अनधिकृत बांधकाम कोणते? यावरून जसखार गावात द्वेषाचे राजकारण पाहावयास मिळत आहे. समोरच्याने गाय मारली म्हणून आपण वासरु मारणे अशा म्हणीप्रमाणे विरुद्ध सदस्यांवर याचिका करुन गावाचे भविष्य धोक्यात घालू इच्छित नाही. याबाबीवर व निकालावर जसखारवासियांनी चिंता व चिंतन करावे, असे विचार काशिबाई ठाकूर यांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यांच्यावरच आता चिंतन करण्याची वेळ आली आहे. त्याच आता या म्हणीप्रमाणे वागत आहेत असा आरोप युवा सामाजिक संस्थेने व ग्रामस्थांनी केला असून सरपंच काशीबाई ठाकूर यांनी रत्नेश्वरी मंदिर परिसराच्या जमिनीचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना बोलाविले. जमीन मोजण्यास सांगितली. मात्र युवा सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी त्यास विरोध केला. या सर्व पार्श्वभूमीवर सरपंच काशीबाई ठाकूर यांच्या या कार्यपद्धतीचा जसखारच्या ग्रामस्थांनी व युवा सामाजिक संस्थेने तीव्र निषेध केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री रत्नेश्र्वरी देवीच्या मंदिराचे तसेच लगतच असलेल्या काफरी काका देवाचे मंदिर हे ज्या सर्वे नंबरमध्ये आहेत त्या सर्वे नंबरचे मोजमाप करण्यासाठी भूमिअभिलेखमध्ये पैसे भरून कुणाल मधुकर ठाकूर आणि जसखार गावचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख तसेच ग्रामपंचायत जसखारच्या घंटागाडीचे चालक राकेश गणेश ठाकूर यांनी मंदिराचे मोजमाप करण्यासाठी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना बोलाविले होते. त्यांना युवा सामाजिक संस्था व ग्रामस्थ जसखार यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्यामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत माघारी फिरावे लागले आहे.
सरपंच काशीबाई ठाकूर यांनी श्री रत्नेश्र्वरी देवीच्या पार्किंगमध्ये बांधलेले स्वतःचे अनधिकृत घर तुटू नये म्हणून मंदिरावर मोजमापाची वेळ आणली. यासारखी दुर्दैवी घटना कोणतीही नाही. अशी दुर्दैवी घटना जसखार गावात याआधी कधी घडली नव्हती. तरी या घटनेमागे स्वयंघोषित आमदार यांचा हात असल्याचा आरोप युवा सामाजिक संस्थेने केला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण विभागात रंगली आहे. तरी उरण पंचक्रोशीत या सर्व घटनेचा आणि संबधित लोकप्रतिनिधींचा युवा सामाजिक संस्थेने व जसखारमधील ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला आहे.
