प्रतिनिधी
रायगड : रायगड जिल्हयातील तळा तालुक्याच्या मुख्यालयी नव्याने ग्रामीण रुग्णालय स्थापनेस राज्यशासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही आणि देखभाल दुरुस्ती करून हे रुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, कार्यकारी अभियंता महाड महेश नामदे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तळा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्राप्त असून मुख्य इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. आंतररुग्ण विभागास नव्याने प्रशासकीय मान्यता मिळाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचे तातडीने बांधकाम आदेश देण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी यावेळी बांधकाम विभागास दिले.
या रुग्णालयात बाह्यरुग्ण व इमर्जन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरीचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची तातडीने नियुक्ती करावी तसेच एक्सरे मशीन व इतर रुग्ण संबधी अत्यावश्यक साहित्य, साधनसामुग्री तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक यांना देण्यात आले होते. त्यानुसार सर्व साधन सामग्री आणि मनुष्यबळ या रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अंबादास देवमाने यांनी यावेळी सांगितले. या रुग्णालयात आय सी यु बेड्स आणि आवश्यक तो औषधंसाठा आणि रुग्ण वाहिका सुविधा प्राधान्याने उपलब्ध राहतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना तटकरे यांनी यावेळी दिल्या.
तळा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील रस्ते आणि पथदिवे बसविण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाने करावी तसेच रुग्णालयासाठी सफाई कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या. तळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काही प्रमाणांत पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये रुग्णसेवेसाठी एक आठवड्यामध्ये बाहयरुग्ण विभाग व ईमरजन्सी रुग्ण तपासणी सेवा सुरु करण्यांत यावी असेही आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.
