अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारा विरोधात छेडणार आंदोलन
श्रीवर्धन वीज कामगार महासंघाचा इशारा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्याचे महावितरण उपविभागीय कार्यालयात श्रीवर्धन शहरी विभागाचे कामकाज पाहणारे सहाय्यक अभियंता पी. जे. चालिकवार यांच्या मनमानी कारभार विरोधात वीज कामगार महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील महावितरण कंपनीत अभियंता चालिकवार हे एक वर्षापूर्वी कामावर रुजू झाले आहेत. श्रीवर्धन शहरी विभागाचे कामकाज त्यांच्याकडे आहे. मात्र, कामावर वेळेत न येणे, कंपनी अंतर्गत कामकाजात दुर्लक्ष करणे अशा अनेक तक्रारी चालिकवार यांच्या विरोधात येत आहेत.
दुसरीकडे महावितरण कंपनीच्याच कामगारांची नियमित होणारी हजेरी करण्यात दुर्लक्ष केलं जात आहे. त्यातून त्यांना दमदाटी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना वेळेत वेतन सुद्धा मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे अखेर विज कामगार महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी चालिकवार यांच्या मनमानी व नियमभाहय कारभाराबाबत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांच्या विरोधात बुधवारी श्रीवर्धन उपविभागात गेट मीटिंग घेतली. तसेच त्यांच्या मध्ये जर सुधारणा झाली नाही तर पुढील आंदोलनाचे पत्र उप कार्यकारी अभियंता श्रीवर्धन यांना देण्यात आले.
श्रीवर्धन वीज कामगार महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.
-विजय बोरसे,
उप कार्यकारी अभियंता श्रीवर्धन.
