• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवीपारंगीत जलजीवनच्या कामाचा सावळागोंधळ!

ByEditor

Sep 5, 2024

काम पुर्ण नसताना देखील पुर्ण झाल्याचे बील काढण्याचा प्रकार उघडकीस

अब्दुल सोगावकर
सोगाव :
रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात कामे केली जात आहेत. परंतु, या कामांचा सावळागोंधळ दिवीपारंगीमधील सामाजिक कार्यकर्ते जयवंत ठाकूर यांनी उघडकीस आणला असून योजनेचे काम झाले नसताना लाखो रुपयांचे बील काढून ते गिळंकृत करण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामपंचायत हद्दीतील दिवीपारंगी गावातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागामार्फत ७३ लाख रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. एका एजन्सीला या योजनेचे काम देण्यात आले. मात्र नऊ महिन्यापुर्वी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी काम पुर्ण झाल्याची नोंद जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागात करून कामाचे पुर्ण बील झाद एंटरप्रायझेस कंपनीच्या नावाने काढण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी उघड केले आहे. सद्यस्थितीत गावातील जलजीवनचे काम अपुर्णच आहे. जलजीवनचे काम पुर्ण झाले नसल्याचा आरोप जयंवत ठाकूर यांनी केला आहे. ही बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी ठेकेदाराला काम पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या या कारभाराबाबत जनतेमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा सावळागोंधळ यानिमित्ताने उघड झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशाच प्रकारे कामे न करता बिले काढण्यात आली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपुर्ण काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्या कामात देखील भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाले आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेला खड्डा वरच्या वरच खोदला जात आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिवीपारंगीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत केले जात आहे. ग्रामपंचायतीला याबाबत कोणतीही माहिती नाही. दिवीपारंगी येथील अपूर्ण कामाबाबत तक्रार दाखल केली होती. काम आता सुरु झाले आहे.
-प्रदीप दिवकर
ग्रामविकास अधिकारी, चिंचोटी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!