• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आढावा महाड विधानसभेचा

ByEditor

Sep 5, 2024

महाड विधानसभा मतदार संघात आ. गोगावलेंची चौकार मारण्याची इच्छा!

तीनवेळेच्या बिगर कॉँग्रेसी आमदारांसाठी ‘सोळावं वरिसं धोक्याचं’ परंपरा

शैलेश पालकर
पोलादपूर :
रायगड लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर सलग दोनवेळी खासदारकी मिळविणारे अनंत गीते यांचा 2019 आणि 2024 मध्ये पराभव करण्यात विद्यमान खासदार सुनील तटकरे यशस्वी झाले आहेत. त्याचप्रमाणे 194 महाड विधानसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यापासून महाडचे आमदार भरत गोगावले हे सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पुनर्रचित महाड विधानसभा मतदार संघात आ. गोगावले यांच्याकडून सलग तीनवेळा पराभव पत्करावा लागलेले माजी आमदार माणिक जगताप यांचे निधन झाले असून त्यांची मुलगी स्नेहल जगताप-कामत आता आ. गोगावले यांचा चौथ्यावेळी पराभव करण्याची मानसिकता बाळगून आहेत. यामागे 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे अनंत गीते यांना 81 हजार 938 मतदान झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना 75 हजार 113 मते मिळाली म्हणजेच शिवसेनेकडे केवळ 6 हजार 825 मताधिक्य राहिल्याने ‘अब दिल्ली बहुत दूर नही’ अशी आकाशाला दोन बोटे लागणे बाकी असल्याची भूमिका आहे. मात्र, महाड विधानसभा मतदार संघात तीनवेळा बिगर काँग्रेसी अन् एकवेळा काँग्रेसी आमदाराची परंपरा असल्याने या न्यायाने आ. गोगावले यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली असून त्यासाठी लोकसभेचे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत वाढत असल्याची समीकरणं 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवेळी लक्षात घेण्याची नितांत गरज असल्याचे येथे नमूद करावेसे वाटत आहे.

महाड विधानसभा मतदार संघात रायगड लोकसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा विजयी झालेले खासदार सुनील तटकरे यांना 77 हजार 877 मते तर अनंत गीते 75 हजार 261 मते मिळाली. या महाड विधानसभा मतदार संघात 3 हजार 616 मताधिक्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खा. तटकरे यांना असल्याची आकडेवारी मागील अनेक निवडणुकाप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये वाढण्याची शक्यता निदर्शनास आणून देण्याची अपरिहार्यता आहे. 2009 मध्ये भरतशेठ गोगावले यांना आमदारकी मिळाली; तेव्हा त्यांनी माणिक जगताप यांचा 14 हजार 50 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये आ. भरतशेठ गोगावले यांनी माणिक जगताप यांचा पराभव करताना 21 हजार 256 मताधिक्य मिळविले होते. 2019 मध्ये देखील हे मताधिक्य कायम राहिले आणि आ. गोगावले (1 लाख 2 हजार 273 मते) यांनी माणिक जगताप (80 हजार 698 मते) यांचा पराभव करताना 21 हजार 257 मताधिक्य मिळविले.

महाड विधानसभा मतदार संघाच्या नियमानुसार तीनवेळा बिगरकॉँग्रेसी उमेदवार निवडून येण्याचा प्रघात यंदा अडचणीमध्ये आहे. कारण तीनवेळा बिगरकॉँग्रेसी उमेदवार म्हणून निवडून आलेल्या आ.गोगावले यांच्यासमोर कॉँग्रेसी उमेदवार नाही. स्व.माणिकराव जगताप हे एकवेळा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर तीनवेळा कॉँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविताना पराभूत झाले. मात्र, आता स्व.माणिक जगताप यांची मुलगी स्नेहल कामत जगताप या कॉँग्रेस पक्ष घटक पक्ष असलेल्या महाविकास आघाडीमध्ये असूनही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत. अशाही परिस्थितीत आ.गोगावले यांना चौकार मारण्याची जबरदस्त महत्वाकांक्षा दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या सत्तांतर नाटयावेळी आ.गोगावले यांचे शिवसेना पक्षप्रतोदपद आणि शिवसेना पक्षाच्या तसेच आमदारांच्या बंडखोरीच्या वैधतेबाबतचा निवडा सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना काय निकाल लागेल, अथवा निकाल लागेल की नाही, याबाबतची प्रश्नचिन्ह आ.गोगावले यांच्या चौकाराची संधीबाबत जनमानसातून निर्णय देणार आहे.

महाड विधानसभा मतदार संघ कोणेएके काळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, 1962 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे शंकर बाबाजी साळुंखे यांच्याविरूध्द काँग्रेसचे शंकर बाबाजी सावंत यांनी 12 हजार 664 एवढी समान मते मिळवून चिठ्ठीवर विजय मिळवला. यानंतर,महाड विधानसभा निवडणुकीत शंकर बाबाजी तथा दादासाहेब सावंत यांनी 1962, 1964 आणि 1967च्या सलग तीन विधानसभा निवडणूका जिंकून काँग्रेसी मतदार संघ निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर महाड विधानसभा मतदार संघाला तीनवेळा बिगरकाँग्रेसी आणि एकवेळा काँग्रेसी आमदाराची परंपरा लाभली आहे. ही परंपरा आजतागायत सुरू राहिली आणि तीनवेळा शिवसेनेचे माजीमंत्री आ.प्रभाकर मोरे विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव जगताप विजयी झाले. यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. माणिक जगताप यांचा पराभव शिवसेनेचे भरत गोगावले यांनी केला आणि ते आमदार झाले आणि 2014 काँग्रेसचे माजी आ. माणिक जगताप यांचा शिवसेनेचे आ.भरत गोगावले यांनी दुसऱ्यांदा पराभव केला. तिसऱ्यांदा 2019 मध्ये आ.गोगावले आणि माजी आ.माणिक जगताप आमनेसामने उभे ठाकल्यानंतर आश्चर्यकारकारित्या 21 हजार 256 मताधिक्याचा आकडा कायम राहून आ.गोगावले विजयी झाले.

1962 मध्ये शं. बा. तथा दादासाहेब सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढवित प्रजा समाजवादी पक्षाचे शंकर बाबाजी साळुंखे यांचा पराभव केला तर 1964 मध्ये आयएनडीचे पी. के. रामेश्वर यांचा पराभव केला आणि तिसऱ्या वेळी 1967 मध्ये प्रजा समाजवादी पक्षाचे किशोर पवार यांचा पराभव केला. या दादासाहेबांच्या हॅट्रिकनंतर 1972 मध्ये दिगंबर विनायक तथा नाना पुरोहित यांनी समाजवादी पार्टीतून 27 हजार 737 मते मिळवून काँग्रेसचे कमल विचारे (22 हजार 401 मते) यांचा पराभव केला. यानंतर आमदार झाल्यानंतर जनता पार्टीतून उमेदवारी लढणाऱ्या नाना पुरोहितांसमोर 1978 मध्ये तीनवेळी सलग आमदारकी मिळविणारे शं. बा. तथा दादासाहेब सावंत यांनी काँग्रेसकडून उमेदवारी लढली. मात्र, आ. नाना पुरोहितांना 37 हजार 413 मते मिळाली तर दादासाहेबांना 22 हजार 46 मते मिळून पराभव पत्करावा लागला. मात्र, आणिबाणीनंतर जनता पार्टीची लाट असूनही दोनच वर्षांत काँग्रेसचे बॅ. ए. आर.अंतुले यांचा प्रभाव वाढू लागला असताना महाड विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे चंद्रकांत देशमुख यांनी 22 हजार 879 जनता पार्टीचे किशोर देशमुख (14 हजार 35 मते) यांचा पराभव केला. यामुळे दादासाहेब सावंत यांच्या हॅट्रिकनंतर दोन वेळ पराभव पत्करलेल्या काँग्रेसला तिसऱ्यावेळी आमदारकी मिळाली. तरीही त्यापुढील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ॲड. सुधाकर सावंत यांच्या विरूध्द अरूण देशमुख, ॲड. विजयसिंह जाधवराव व श्रीपत भोसले यांनी कायम दंड थोपटल्याने काँग्रेसमधील कलगीतुऱ्याचा लाभ विरोधीपक्षांनी पुरेपुर उठविला.

1985 मध्ये जनता पार्टीचे शांताराम फिलसे हे 32 हजार 40मते मिळवून ॲड. सुधाकर सावंत (31 हजार 391मते) यांच्याविरूध्द विजयी झाले. अगदी थोडयाच मतांनी झालेला ॲड. सावंत यांचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला नाही तर उलट, बंडखोरीला खतपाणी घालणारा ठरला. याचवेळी शिवसेनेचा मुंबईतून कोकणात शिरकाव झाला आणि शिवसेनेचे प्रभाकर मोरे हे 1990 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले. यावेळी आ. फिलसे यांचे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निधन झाले. याचा लाभ शिवसेनेला मिळून प्रभाकर मोरे यांना 32 हजार 220 मते मिळाली तर काँग्रेसचे ॲड. सावंत यांना (29 हजार 110 मते) दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला. शांताराम फिलसे यांची मते मृत्यूनंतरही लक्षणीय होती. मात्र, येथून जनता पार्टीचा ऱ्हास होत गेला आणि शिवसेनेने समाजवादी पार्टीच्या मतांवर कब्जा करण्यास सुरूवात केली. परंतू, काँग्रेसअंतर्गत बंडाळी कायम राहिली. यानंतर राज्यात भगवी लाट आल्याने शिवसेनेचे आ. प्रभाकर मोरे यांच्यासमोर ॲड. सुधाकर सावंत यांच्याऐवजी काँग्रेसने अरूण देशमुख यांना उमेदवारी देऊ केली. यावेळी ॲड. सावंत यांनी बंडखोरी केली. यामुळे आ. प्रभाकर मोरे यांना 41 हजार 705 मते मिळून अरूण देशमुख (21 हजार 123 मते) यांचा सहज पराभव करता आला. युती सरकारमध्ये प्रभाकर मोरे प्रथम गृह व उद्योग राज्यमंत्री व नंतर ग्रामविकास मंत्री झाले.

यादरम्यान, रायगड जिल्हा परिषदेच्या महाड तालुक्यातील वाळण, दासगांव आणि नाते मतदार संघांतून निवडून आलेले काँग्रेसचे सरचिटणीस व ॲड. सुधाकर सावंत यांचे राजकीय शिष्य माणिक जगताप यांचे नेतृत्व उदयास येऊ घातले होते. मात्र, युती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या प्रभाकर मोरे यांच्यासमोर हे आव्हान नगण्य वाटत होते. सुदैवाने सर्व काँग्रेसजन माणिक जगताप यांच्या पाठिशी एकवटले आणि बंडखोरी टळून मतविभाजनही टाळले जाईल, अशी अपेक्षा असताना पोलादपूरचे सुरेश जाधव यांनी केवळ 3 हजार 630 मते मिळवून माणिक जगताप यांच्या विजयला खीळ घातली. या अटतटीच्या निवडणुकीमध्ये युतीसरकारमध्ये मंत्री असलेले प्रभाकर मोरे यांना 46 हजार 212 मते मिळाली आणि त्यांनी काँग्रेसचे माणिक जगताप (42 हजार 965मते) यांचा निसटता पराभव केला. मात्र, युती सरकार गेल्याने प्रभाकर मोरे नामदारांचे आमदार झाले. राज्यातील सत्तेत काँग्रेस पक्ष आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना राष्ट्रीय अध्यक्ष शरदश्चंद्र पवार यांनी केल्यानंतर माणिक जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून महाड विधानसभा मतदार संघातील प्रबळ दावेदार झाले. 2004 मध्ये माणिक जगताप यांनी 56 हजार 972 मते मिळवून तीन वेळा निवडून आलेल्या तत्कालीन आमदार प्रभाकर मोरे (53हजार193मते) यांचा पराभव केला.

2009 मध्ये रायगड लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाली. बॅ. अंतुले यांचा पराभव शिवसेनेचे अनंत गीते यांनी केला. त्याच धर्तीवर 2009 मध्ये महाड विधानसभा मतदार संघाचीही पुनर्रचना करण्यात आली. यावेळी पाचवेळा विधानसभा निवडणूक लढणारे प्रभाकर मोरे यांच्याऐवजी रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती भरत गोगावले यांना 2009 मध्ये शिवसेनेकडून महाडची उमेदवारी मिळाली. गोगावले यांना 85 हजार 650 मते मिळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. माणिक जगताप (71हजार600मते) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

यानंतर आ. गोगावले यांचा विधानसभेचा कार्यकाळ सुरू असतानाच माजी आमदार माणिक जगताप स्वगृही काँग्रेस पक्षात परतले. या काळात, माणिक जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभागीय मतदार संघाच्या विधानपरिषद पोटनिवडणुकी वेळी अनिल तटकरेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून उमेदवारी केली आणि ते पराभूत झाले. यानंतर माणिक जगतापांनी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. मात्र, नंतर याच स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभागीय मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणुकी वेळी आघाडीचा धर्म पाळत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल तटकरे यांना सहकार्य केले तर लोकसभा निवडणुकी वेळीही सुनील तटकरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळून आघाडीचा धर्म पाळला. यानंतरही विधानपरिषद सदस्य अनिल तटकरे यांनी माणिक जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाडची जागा त्यांना देऊ, अशी अट घातली तर पेणमध्ये स्वतः अनिल तटकरे यांनी उमेदवारी लढविण्याची तयारी केली. पण याच काळात काँग्रेस पक्षाने जगतापांना कोकण म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन केले तर राष्ट्रवादीतून शिवसेनेचे माजी मंत्री प्रभाकर मोरे स्वगृही शिवसेनेमध्ये मरेपर्यंत राहण्यासाठी परतल्यानंतर आ. गोगावले यांना कोणताही पर्याय शिवसेनेमध्ये राहिला नाही.

या सर्व घडामोडींदरम्यान लोकसभेसाठी मोदी लाट आणण्याचा जाणीवपूर्वक प्रचार सुरू झाला आणि याच काळात शिवसेनेच्या अनंत गीतेंसमोर राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे यांची लढत उत्कंठावर्धक ठरली. या रायगड लोकसभा मतदार संघातील 16 व्या लोकसभा निवडणुक लढतीत खा. गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मते मिळाली तर सुनील तटकरे यांना 3 लाख 94 हजार 68 मते मिळाली आणि खा. गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले. खा.गीते यांनी महाड विधानसभा मतदार संघातुन 82 हजार 55 तर तटकरे यांनी 65 हजार 227 मते मिळविली. म्हणजेच, शिवसेनेकडे लोकसभेवेळी दिसून आलेले 16 हजार 828 हे मताधिक्य फारसे नव्हते अशा धारणेतून विधानसभा निवडणुकीत आ. गोगावले विरूध्द माजी आमदार जगताप यांची दुसऱ्यांदा लढत होऊन आ. गोगावले यांना 94 हजार 194 मते आणि माजी आ. जगताप यांना 72 हजार 983 मते मिळून आमदार गोगावले हे 21 हजार 256 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. याचाच अर्थ, लोकसभेच्या मताधिक्यात 4 हजार 383 मतांची वाढ झालेली दिसून आली आणि महाड विधानसभा मतदार संघात तीनवेळा बिगरकाँग्रेसी आणि एकवेळा काँग्रेसी आमदार निवडून येत असल्याच्या परंपरेत बिगरकाँग्रेसी शिवसेनेचे आ. गोगावले यांना तिसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाली.

आधीच्या तीन लोकसभा निवडणुकांचे मताधिक्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाढल्याचे दिसून आले असले तरी यंदा महाड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे मताधिक्य अतिशय किरकोळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित निकालामुळे आ. गोगावले हे आगामी निवडणुकीच्या रिंगणात असतील, अथवा कसे किंवा रिंगणात आल्यास ते चौकार मारून पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रवेश करतील, अथवा कसे हा राजकीय विश्लेषणाचा तसेच महाड विधानसभा मतदार संघाच्या राजकीय प्रघाताचा विषय आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!