• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्रीवर्धनमध्ये बिबट्याची दहशत

ByEditor

Sep 5, 2024

सर्वा, दांडगुरी नंतर कोंढेपंचतन परिसरात बिबट्याचे दर्शन ! स्थानिकांमध्ये घबराट

सणासुदीला जंगल भागातील गावात भीतीचे वातावरण

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील गावो गावी काही दिवसाआड बिबट्याचे दहशत वाढू लागली आहे. पहिल्यांदा सर्वा त्यानंतर दांडगुरी आणि आता कोंढेपंचतन परीसरात रात्रीच्यावेळी गावा लगत बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सणासुदीला हा प्रसंग ओढवल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी गाव सोडल्यानंतर तीन दिवसापूर्वी सोमवारी रात्रीच्यावेळी श्रीवर्धन – बोर्ली पंचतन मुख्य रस्त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या मागील दिवसात याच मार्गावर रस्त्याला वावरत असताना हा बिबट्या अचानक येणाऱ्या वाहनांच्या आवाजाने दांडगुरी परिसरातील असलेल्या झाडा झुडपांमध्ये लपून बसतो व पुन्हा रात्री बेरात्री बाहेर येतो. असं येथील ये – जा करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे. एकतर बिबट्याचे नावाने अनेकांचा थरकाप उडतो. आता सदर बिबट्याने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील सर्वा, दांडगुरी नंतर बुधवारी कोंढेपंचतन गावचे रहिवाशी विनोद खेडेकर आणि अनंत खेडेकर हे आपल्या गुरांना चरण्यासाठी नेले असता बिबट्याने गायीवर हल्ला केला आहे. त्यातून गायीने धडपड करत आपला जीव वाचवला आहे. मात्र, त्याच रात्री बिबट्या गावा जवळ दिसल्याचे काशिनाथ वरणकर यांनी माहिती दिली आहे. हे परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव, तसेच उंच डोंगर लागून असल्याने हा दुर्गम आणि शांत परिसर म्हणून ओळखला जात आहे. विशेष म्हणजे सदर बिबट्या दिसल्यापासून सर्वांना खबर लागल्याने परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.

सद्या वाघ जंगल सोडून मानववस्तीत आल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सणासुदीच्या दिवसांत बिबट्याच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, शेतीची हंगामी कामे करणे, किंवा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालविणे, ही या लोकांची कामे आता बिबट्याच्या भीतीमुळे खोळंबली जाणार आहेत. त्यामुळे वनविभागाकडून जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त लावला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही, हेही तितखेच खरे आहे.

तालुक्यातील जंगल परिसरात बिबट्याचे मोठ्या अंतरात भ्रमंती होते, तो बिबट्याचा अधिवास आहे. त्यामुळे तो अनेकांना अधून मधून दिसत असतो. यामुळे आम्ही ग्रामस्थांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे गावांना सतर्कतेसाठी भेटी देत आहोत.
-संजय पांढरकामे
वनपरिक्षेत्रपाल श्रीवर्धन

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!