कोलाड ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा
विश्वास निकम
कोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड-इंदापूर ते माणगाव दरम्यान साधारण २३ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होताना दिसत आहे.
गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी आपल्या गावाला येत असतात. यावर्षीही सकाळपासून मुंबई गोवा महामार्गावरुन दुचाकी, रिक्षा, चारचाकी, एसटी बस, खासगी बस, मालवाहू ट्रक यांची प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु झाल्यामुळे कोलाड-इंदापूर ते माणगाव या २३ किलोमीटरच्या अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामध्ये कोलाड, इंदापूर, माणगाव बाजारपेठेतील रस्ता एकेरी असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असुन यामुळे प्रवाशी वर्गाचा खोळंबा झाला असुन गावाला जाण्यासाठी विलंब होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच तासाच्या प्रवासाला १२ ते १५ तास लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा यासाठी रायगड पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन जागजागी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होताना दिसत आहेत.
