अमूलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात असणाऱ्या अठ्ठावीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २७३ सार्वजनिक तर १ लाख ३ हजार २४ ठिकाणी खासगी घरगुती असे एकूण १,०३,२९७ श्री गणेश मुर्ती विराजमान होणार आहेत. त्याचप्रमाणे १५८३२ गौरीचे आगमन होणार असल्याची माहिती रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
कोकण म्हटले की उत्सवांची आठवण येते आणि कोकणात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रासहित इतर राज्यातील चाकरमानी आपापल्या गावी येतात. एक दिवसावर आलेला हा गणेशोत्सव श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होतो. आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन ७ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश चतुर्थीला होणार आहे. प्रामुख्याने कोकणात घराघरात गणेशोत्सव श्रद्धेने साजरा होतो. मुंबई व अन्य ठिकाणी असलेले जिल्हावासीय चाकरमानी या निमित्ताने आपापल्या गावी येतात. दीड दिवसापासून अनंत दिवसापर्यंत म्हणजे अनंत चतुर्थीनंतरही थांबतात कारण काही ठिकाणी २१ दिवसापर्यंत गणपती असतात.

श्री गणेश स्थापना ही ७सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. ८ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्ह्यातील अकरा सार्वजनिक तर २७ हजार गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर २०२४ रोजी दोन सार्वजनिक तर तीस खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १० सप्टेंबर २०२४ रोजी १५८३२ गौरी मातेचे आगमन होणार असून या दिवशी बारा गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबर २०२४ रोजी चौदा सार्वजनिक गणपती बाप्पा, २५४४ खासगी गणपती बाप्पा तर १५८३२ गौरी मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर २०२४ रोजी ७९ सार्वजनिक तर ५४९२३ खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १३ सप्टेंबर २०२४ अकरा सार्वजनिक तर २७६ खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर २०२४ रोजी दोन सार्वजनिक तर ८० घरगुती गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सहा सार्वजनिक व २८६ खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १६ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतु्दशीचे ११४ सार्वजनिक तर १७,३५९ खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी ५९ खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. १८ सप्टेंबर २०२४ रोजी ३७० खासगी गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यात २५३ ठिकाणी समुद्रात, १०५ ठिकाणी खाडीमध्ये, २४४ ठिकाणी नदीमध्ये, १०० ठिकाणी तलावात तर ९४ ठिकाणी कृत्रिम तलावात गणपती बाप्पा यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. तर श्री गणपती बाप्पा यांची मशिद, दर्गा येथून ५४ तर अठरा मोहल्ल्यातून मिरवणुका निघणार आहेत. श्री गणेश उत्सव सणासाठी रायगड जिल्ह्यात नऊ पोलिस उप अधीक्षक, २६ पोलिस निरीक्षक, १२८ सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक तर १७०० पोलिस कर्मचारी तैनात असून बाहेरून पुरविण्यात येणाऱ्यामध्ये ५०० गृह रक्षक दल (होमगार्ड), एसआरपीएफ कंपनी एक, तीस अधिकारी तर ३०० पोलिस कर्मचारी आहेत. याशिवाय दहशतवाद विरोधी पथकामध्ये एटीबी व एटीसी पथक नेमण्यात आले असून सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर सेलचे एक पोलिस अधिकारी आणि पाच पोलिस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हा सण सुरळीत व शांततेत व्हावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासन खबरदारी घेत असून यानिमित्त वाढलेली वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाचा कटाक्ष असतो. रेल्वेनेही यावर्षी मोठ्या प्रमाणात गणपतीसाठी खास गाड्या कोकणात सोडल्या आहेत. याशिवाय मुंबई गोवा महामार्गावर खासगी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस तसेच खासगी बस सेवा तसेच आपापल्या खासगी वाहनांतून मोठ्या प्रमाणात वाहनांनी भाविक दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानके, बस स्थानक गर्दीने फुलले आहेत.
रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे. गणपतीच्या शाळा गजबजल्या असून मूर्तिकार अखेरचा हात फिरविण्याच्या गडबडीत आहेत. काही शाळांमधून तर बाप्पाला आपल्या घरी नेण्याचे काम सुरू झाले आहे.
गणेश उत्सव हा सण दि. ०७/०९/२०२४ रोजी पासुन सुरु होत आहे. सदरचा सण हा मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जात असुन विशेष करुन गणपती उत्सव हा कोकणात मोठ्या प्रमाणांत साजरा केला जात असल्याने मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ या मार्गावर मोठ्या प्रमाणांत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कोकणांत जाणाऱ्या प्रत्येक नागरिक यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरीता शासनाकडुन दिलेल्या सुचनांप्रमाणे निर्देशित केल्या आहेत.
-सोमनाथ घार्गे
पोलिस अधीक्षक, रायगड.
रायगड जिल्हा सार्वजनिक व घरगुती गणपती आणि गौरीची माहिती
| पोलिस ठाणे | सार्वजनिक गणपती | घरगुती गणपती | खासगी गौरी |
| कर्जत | २७ | २५०१ | १३४६ |
| नेरळ | १० | ३५५० | १२५२ |
| माथेरान | २ | ११८ | २१ |
| खालापूर | ७ | २४१४ | २६२ |
| खोपोली | ७ | २४१४ | २५० |
| रसायनी | २२ | २२९२ | १५२ |
| पेण | ११ | ५७५० | १३८५ |
| वडखळ | ३ | ५४४० | २९२ |
| दादर सागरी | २ | ४५२० | ५३५ |
| पोयनाड | १० | ५३९० | २८८ |
| अलिबाग | ९ | ५१५६ | १२०० |
| मांडवा | १ | ३५८६ | ५४० |
| रेवदंडा | २ | ६४५३ | ५२० |
| मुरुड | ०० | ५२१५ | ३७५ |
| रोहा | ५ | ३६३५ | २९८ |
| नागोठणे | ११ | २०१५ | ३७५ |
| कोलाड | १० | १९३० | २५४ |
| पाली | १३ | ४२३२ | ९१८ |
| तळा | १ | ४२१६ | ११६ |
| श्रीवर्धन | ३ | ४२८३ | ६४२ |
| म्हसळा | १ | २५५० | ११० |
| दिघी सागरी | १ | ४५२५ | ९०० |
| महाड शहर | २५ | २५५५ | १३६१ |
| महाड एमआयडीसी | २० | १२५८ | २३० |
| महाड तालुका | ८ | १९८५ | ११० |
| पोलादपूर | ७ | १८१० | ५३० |
| एकूण | २७३ | १०३०२४ | १५८३२ |
