विनायक पाटील
पेण : नुकत्याच पार पडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रं. २ मध्ये केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मूल्यांकनात रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा खारपाडा पेण तालुक्यातून अव्वल ठरली असून शाळेने प्रथम क्रमाकांचे बक्षीस मिळवले आहे.
खारपाडा शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करीत आली आहे. सन २०२३/२४ या वर्षात इयत्ता ५ वी या वर्गातून शिष्यवृती स्पर्धेत ग्रामीण भागातून तालुक्यातून प्रथम शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी याच शाळेचा असून नवोदय विद्यालय परीक्षेत ग्रामीण भागातून एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. शाळेत स्वतंत्र प्रयोगशाळा व वाचनालय आहे. आतापर्यंत शाळेने ५० ते ६० लाखापर्यंत कंपनी CSR फंडातून काम केले असून शाळेची नवीन इमारत उभी केली आहे. शाळेत प्रोजेक्टर, व्हिव्ह बोर्ड, वेब कॅमेरे, वायफाय सुविधा, विद्यार्थ्यांसाठी जीम पार्क इत्यादी सुविधा असून शाळेत नेहमी विविध व्याख्याने , सर्पमित्र , बँकिंग व्यवस्था, किशोरवयीन मुलामुलींसाठी मार्गदर्शन, मुलींसाठी कराटे, गड किल्यांविषयी मार्गदर्शन व सहलींचे आयोजन केले जाते.
शाळेचा सध्याचा पट १७५ विद्यार्थी असून शाळेतील सर्व शिक्षक उच्चशिक्षित आहेत. शाळेचे कार्यक्षम मुख्याध्यापक यांना आतापर्यंत समाजभूषण, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, २०२३/२४ चा रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार, एंपोहर फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, अखिल प्राथमिक शिक्षक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.
शाळेची कार्यक्षम शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सदस्या व शिक्षक वृंद यांच्या एकोप्यानेच आज शाळा प्रगती पथावर असल्याचे दिसून येते.
