सोगाव येथील राजिप उर्दू शाळेच्या नविन इमारतीच्या बांधकामाकरिता 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील जमातुल मुस्लिमीन सोगाव यांच्या मालकीच्या जागेत राजिप उर्दू शाळेकरिता नविन इमारत बांधकामासाठी मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी समाज अध्यक्ष मुर्तुजा कुर यांच्याकडे ५० हजार रुपयांचा धनादेश सोगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुपूर्द केले.
सोगाव येथील सोगाव जमातुल मुस्लिमीन यांच्या मशीदजवळ रस्त्याच्या कडेला स्वतःच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीत राजिप प्राथमिक उर्दू शाळा भरवण्यात येत आहे. सदर इमारत जीर्ण झालेली असून नविन जागेत इमारत बांधकामासाठी निधीची कमतरता निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यात नेहमीच सिंहाचा वाटा उचलणारे मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पुढाकार घेऊन सोगाव जमातुल मुस्लिमीन यांच्या सदस्यांसोबत चर्चा केली. तसेच गुरुवार, दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राजिप उर्दू शाळेत झालेल्या कार्यक्रमात उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी त्यांना त्यांचे भविष्य ज्याठिकाणी घडणार आहे त्या प्रशस्त व सुंदर तसेच सर्व सुखसोयींनी युक्त नविन इमारतीच्या बांधकामासाठी मदत म्हणून तब्बल ५० हजार रुपयांचा धनादेश सोगाव जमातुल मुस्लिमीनचे अध्यक्ष मुर्तुजा कुर यांच्याकडे मुस्लिम समाजातील मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, रुस्तुम कुर, मुनावर कुर, राजिप प्राथमिक उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द केला.
याबाबत एका उभरत्या तरुणाने उर्दू शाळेच्या नविन इमारतीच्या बांधकामासाठी मदत करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल सोगाव मुस्लिम समाजाने सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे कौतुक करत आभार मानले आहेत.
