चारफाटा ते करंजा दरम्यान तोल जाऊन पडल्याने रितू डंपरच्या चाकाखाली चिरडली
नवीन शेवा येथील डंपर चालक रमेश चव्हाण वाहनासहित ताब्यात
घनःश्याम कडू
उरण : तालुक्यात अपघाताच्या घटनांचे सत्रच सुरु आहे. ऐन गणेशोत्सव सणासुदीच्या काळात जड वाहनांमुळे होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रविवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरण शहरातील चारफाटा ते करंजा दरम्यान असलेल्या द्रोणागिरी हॉटेल समोरील रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात करंजा गावातील रितू कोळी या तरुणीचा बळी गेला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी द्रोणागिरी नोडमध्ये झालेल्या अपघाताचा अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते. यामुळे सदर अपघाताचा गुन्हा अजून दाखल का होत नाही अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
उरण चारफाटा ते करंजा दिशेने डंपर क्र. एमएच 46 एफ 7056 जात असताना स्कुटी क्र. एमएच 46 टी 8433 वर रितू संजीव कोळी ही 24 वर्षीय तरुणी समांतर दिशेला जात होती. त्याचवेळी रीतूचा तोल जाऊन ती रस्त्यात पडली आणि थेट डंपरच्या मागच्या चाकाच्या खाली आली. उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील रहिवासी रमेश शंकरराव चव्हाण हा चालक हा डंपर चालवत होता.
सदर अपघातात रितू गंभीर जखमी झाली होती. तिला तात्काळ गाडे हॉस्पिटल, द्रोणागिरी येथे दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचाराकरीता जसलोक हॉस्पिटल, मुंबई येथे पाठविले. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार चालू असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांमार्फत सांगण्यात आले.
