• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दांडगुरी रस्त्यावरील गतिरोधकाने घेतला जीव

ByEditor

Sep 9, 2024

गणेशोत्सवात पालवणकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुःखद घटना शुक्रवारी (ता. 6) घडली. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, भोस्ते येथे राहणाऱ्या सुनंदा पानवलकर ह्या गुरुवारी आपल्या नातवाला गणेशोत्सवासाठी आणायला वडवली येथे सुनेच्या घरी गेल्या होत्या. मात्र, मुलाला सुट्टी नसल्याने तो नाही आला. त्यानंतर त्या आपल्या मुलासोबत दुचाकीने परत भोस्ते येथील आपल्या घरी जात होत्या. दांडगुरी येथे आले असताना तेथील गतिरोधकामुळे पाठीमागून त्यांचा तोल गेला व डोक्याला गंभीर मार लागून बेशुद्ध झाल्या. त्यांना तात्काळ बोर्लीपंचतन येथील खाजगी दवाखान्यात नेले मात्र, अधिक उपचारासाठी इतरत्र हलविताना त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेने सर्वत्र प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी वारंवार अपघाताची भीती प्रवाशांमध्ये कायम आहे. त्यामुळे येथील गतिरोधक हटवण्याची मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.

दोनशे मीटरमध्ये 5 गतिरोधक –
गतिरोधक कुठे असावा याबाबतीत नियमावली आहेत. मात्र, दांडगुरी येथे अधिकच्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार ठरवण्याची मागणी होत आहे.

लोकांच्या मागणीनुसार आम्ही तिथे गतिरोधक बसवले होते. अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने रंगीत पट्टे बनवले. अधिकचे गतिरोधक आम्ही काढून टाकू.
-तुषार लुंगे,
उपाभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

दांडगुरी येथे इतके गतिरोधक काय कामाचे? माझ्या आईचा जीव गेलाय. त्याठिकाणी ना कोणता फलक, ना पांढरे पट्टे आणि मुंबईवरून आलेल्यांना कसे कळणार? सणासुदीला आमच्या घरात सर्व दुःखी आहेत. असं कुणासोबत न होवो.
-अमृत पानवलकर,
मुलगा

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!