• Thu. Jun 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खेळात राजकारण की राजकारणाचा खेळ? राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा

ByEditor

Jun 11, 2026

तटकरे, मुंडे आणि भुजबळांमध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सुरू असलेली धुसफूस अखेर पक्षाच्या वर्धापन दिनी चव्हाट्यावर आली. तटकरे विरुद्ध भुजबळ अशा रंगलेल्या या संघर्षाला वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर एक वेगळीच किनार लाभली. राज्यसभेची हुकलेली संधी आणि पंकज भुजबळ यांना मंत्रिपदाने दिलेली हुलकावणी, या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ‘मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा नाही’ असे म्हणत सुनील तटकरेंना लक्ष्य केले होते. याच विधानाचा धागा पकडत गुरुवारी पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी पाहायला मिळाली.

तटकरेंची ‘गुगली’: “भुजबळ साहेब, तुम्ही कबड्डीपेक्षा बुद्धिबळच जास्त खेळता”

व्यासपीठावर सुरुवातीलाच जोरदार बॅटिंग करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. भुजबळांच्या विधानाचा समाचार घेताना तटकरे म्हणाले, “भुजबळ हे उत्तम खेळाडू आहेत. तुम्ही कबड्डीचे खेळाडू आहात आणि एकाच वेळी पाच-सात खेळाडू बाद करण्याची ताकद तुमच्यात आहे. बोनस गुणांसह खेळाडू घेण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे. परंतु, सुधीरभाऊ किंवा मनोहर जोशी महापौर झाले नाहीत, तर भुजबळ झाले. याचाच अर्थ तुम्ही कबड्डीपेक्षा बुद्धिबळ जास्त खेळता आणि ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.”

पुढे बोलताना त्यांनी, “तुमच्या एका बाजूला फुटबॉलपटू प्रफुल्ल पटेल आहेत, तर दुसरीकडे कुस्तीपटू हसन मुश्रीफ आहेत; अजितदादांनी असे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू पक्षात तयार केले आहेत,” असा टोलाही लगावला.

धनंजय मुंडेंची चौफेर फटकेबाजी: “सूर्याकुमारलाही संघाबाहेर बसावे लागते”

तटकरेनंतर मैदानात उतरलेले धनंजय मुंडे यांनीही भुजबळांनाच लक्ष्य केले. “इथे खेळ आणि राजकारणावर बरीच चर्चा झाली, पण खरे खेळाडू समोर बसलेले कार्यकर्ते आहेत,” असे म्हणत मुंडेंनी थेट भुजबळांच्या ज्येष्ठतेवर निशाणा साधला. मुंडे म्हणाले,

“खेळात राजकारण असो की राजकारणात खेळ, विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही कधीकधी संघाबाहेर राहावे लागते, तर वयाच्या १५व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला संधी मिळते. याचा अर्थ कर्तृत्वाला आणि कामाला पक्षाने सर्वश्रेष्ठ स्थान देणे गरजेचे आहे.”

नव्या पिढीला संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी भुजबळांच्या नाराजीवर सूचक वक्तव्य केले.

भुजबळांचा ‘मास्टरस्ट्रोक’; एकाच दगडात दोन पक्षी

तटकरे आणि मुंडे यांच्या टोलेबाजीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या जोरावर अशी काही फिरकी घेतली की संपूर्ण सभागृहात हशा पिकला. भुजबळांनी दोन्ही नेत्यांचा समाचार घेत राज्यसभा हुकल्याचा वचपा काढला.

तटकरेंना इशारा: “खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका; पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष द्या,” असा सल्ला भुजबळांनी दिला. भूतकाळात आपल्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असतानाही आपण पक्ष सोडला नाही, याची आठवण करून देत “पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे,” असा थेट इशारा त्यांनी तटकरेंना दिला.

मुंडेंना टोला: त्यानंतर मुंडेंकडे मोर्चा वळवत भुजबळ म्हणाले, “संधी सर्वांनाच मिळते, पण त्या संधीचे सोनं करायचे की माती, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.” भुजबळांच्या या एकाच वाक्याने मुंडेंची बोलती बंद झाली आणि व्यासपीठावर एकच हशा पिकला.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेत्यांमधील अंतर्गत कलह खेळाच्या रूपकात्मक भाषेतून उघड झाला. भुजबळांनी एकाच भाषणातून तटकरे आणि मुंडे या दोन्ही नेत्यांना बॅकफूटवर धाडत, आपण राजकारणातले अद्यापही ‘फॉलोऑन’ न होणारे खेळाडू आहोत हे दाखवून दिले. पक्षांतर्गत धुसफूस आगामी काळात काय वळण घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!