• Wed. Jun 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवसेना पुन्हा फुटली, सहा खासदारांचा गट शिंदेसेनेत विलीन होणार, उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा धक्का!

ByEditor

Jun 17, 2026

नवी दिल्ली : ​लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांच्या फुटीर गटाला अधिकृत मान्यता दिली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला यश आले असून, हे सर्व खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार आहेत.

​’ऑपरेशन टायगर’ची पडद्यामागची रणनीती

कायदेशीर अडचणी आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सावध पावले उचलली. ठाकरे गटाकडून व्हीप (प्रतोदाचा आदेश) जारी होण्यापूर्वीच, मंगळवारी रात्री या सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे वेगळा गट म्हणून मान्यतेसाठी पत्र सोपवले. त्यानंतर बुधवारी सकाळी ११:३० वाजता ओम बिर्ला यांनी या गटाला मान्यता दिली.

​दिल्लीत रात्री रंगल्या घडामोडी

या मोहिमेला अंतिम स्वरूप देण्यासाठी मंगळवारी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, ठाकरे गटाचे ६ खासदार आणि १६ सदस्यांची कायदेविषयक सल्लागार टीम उपस्थित होती. ​कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखालीच अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठीची अंतिम रणनीती निश्चित करण्यात आली.

या सहा खासदारांच्या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ आता १३ वर पोहोचले आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) शिंदे यांची शिवसेना आता तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

​ठाकरेंची घटती ताकद: उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आलेल्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. यामुळे शिंदे यांचा राजकीय प्रभाव आणखी वाढल्याचे स्पष्ट झाले असून, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का आहे.

​आता आगामी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या मंचावर उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन करतील, असे मानले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!