मैथिली पाटीलच्या आईचा आक्रोश; विमान दुर्घटनेला वर्ष उलटले तरी चौकशी अहवाल नाही, मृतांच्या कुटुंबीयांना न्याय कधी?
उरण । घनःश्याम कडू
“माझी मुलगी आता कधीच परत येणार नाही, हे मी मान्य केले आहे. पण ज्या दुर्घटनेत २६० निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्याचे खरे कारण तरी देशाला कळायला नको का? एक वर्ष उलटले, तरी आमची लेकरं नेमकी कशी मेली, हे आम्हाला सांगितले जात नाही. हा अपघात होता की घातपात? दोष कोणाचा होता? तपास यंत्रणा सत्य का लपवत आहेत?” अशा शब्दांत एअर इंडिया विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या आई प्रमिला पाटील यांनी आपल्या मनातील तीव्र संताप आणि वेदना व्यक्त केल्या.
अवघ्या काही सेकंदांत २६० जीव हवेत विरले
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनकडे निघालेले एअर इंडियाचे ‘एआय-१७१’ (AI-171) हे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत अवघ्या काही सेकंदांत २६० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यामध्ये पनवेल तालुक्यातील न्हावा गावची कन्या आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी (Air Hostess) मैथिली पाटील हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. सरकारने तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले, तज्ज्ञ समित्या स्थापन झाल्या आणि मोठमोठी आश्वासने देण्यात आली. मात्र, आज या घटनेला पूर्ण वर्ष होत आले तरी दुर्घटनेचे नेमके कारण जनतेसमोर आलेले नाही.
पाटील कुटुंबाचा मुख्य आधार हरपला
मैथिली ही अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगी होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने हवाई सेविका होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले होते. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्याची, भावंडांच्या शिक्षणाची आणि वृद्ध आई-वडिलांना आधार देण्याची संपूर्ण जबाबदारी तिने स्वतःवर घेतली होती. मात्र, विमान कोसळले आणि पाटील कुटुंबाचे संपूर्ण विश्वच काळोखात बुडाले. आजही तिच्या आठवणींनी घर व्याकुळ असून, तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण न मिळाल्याने कुटुंबीय अस्वस्थ आहेत.
चौकशी यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह
प्रमिला पाटील आणि संतप्त नागरिकांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारले आहेत:
- तपास कुठे रेंगाळला?: दुर्घटनेनंतर विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडला होता आणि तज्ज्ञ समित्याही नेमल्या गेल्या होत्या. मग वर्षभरानंतरही तपास पूर्ण का झाला नाही?
- दोषींना पाठीशी घातले जातेय का?: तांत्रिक बिघाड, मानवी चूक की घातपात? या चर्चांमध्ये अधिकृत निष्कर्षाचा पत्ता नाही. यामुळे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा संशय निर्माण होत आहे.
- पैसा नव्हे, सत्य हवे: मृतकांच्या नातेवाईकांना केवळ आर्थिक नुकसानभरपाई नको, तर निष्पक्ष न्यायाची अपेक्षा आहे.
उरण-पनवेलमधून न्यायाची तीव्र मागणी
आज या काळ्या दिवसाला एक वर्ष पूर्ण होत असताना उरण, पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तीव्र भावना उमटत आहेत. “आमची लेकरं परत येणार नाहीत, पण त्यांच्या मृत्यूचे सत्य तरी देशासमोर मांडा आणि दोषींना कठोर शिक्षा करा,” अशी मागणी जोर धरत आहे. देशाच्या विमान सुरक्षेचा आणि शेकडो कुटुंबांच्या न्यायाचा हा प्रश्न केंद्र सरकारने आता अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, सूर जनतेतून उमटत आहे.
